
आयपीएल 2026 च्या हंगामाची धमाकेदार सुरूवात झाली असून आत्तापर्यंत 12 सामने खेळले गेले. उद्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मात्र यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सध्या खांदा आणि कोपरच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे किमान 20 एप्रिलपर्यंत तरी तो सामन्यात परतणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीला आगामी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मिचेल शिवाय खेळावे लागणार आहे.
मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सला पुढील तीन मोठ्या लढतींना सामोरे जावे लागेल. यामध्ये 8 एप्रिलला गुजरात टायटन्स, 11 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि 18 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांविरुद्धच्या सामन्यांचा समावेश आहे. या तिन्ही सामन्यांत स्टार्क खेळणार नसल्याने, चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. मात्र, तो लवकरात लवकर संघात परतावा यासाठी व्यवस्थापन त्याच्या संपर्कात आहे.
स्टार्कने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दुखापतीची माहिती दिली आहे. यावेळी त्याने काही चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या प्रसारमाध्यमांवर टीकाही केली. “काही लोक माझ्या शरीराची स्थिती माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखत असल्याचा दावा करत आहेत आणि चुकीची माहिती पसरवत आहेत,” असे म्हणत त्याने संताप व्यक्त केला. तसेच, खेळात उपलब्ध होऊ न शकल्याबद्दल त्याने दिल्लीच्या चाहत्यांची माफीही मागितली आहे.
मिचेल स्टार्क जरी संघात नसला तरी अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच 4 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवून यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीने त्यांना 6 फलंदाज आणि 11 चेंडू राखून नमविले. मुंबईने 20 षटकांत 6 बाद 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 163 धावांचे लक्ष्य 18.1 षटकांत 4 गडी गमावत सहज गाठले. यापुढचा सामना 8 एप्रिल रोजी खेळला जाणार असून यामध्ये कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IPL 2026 – दिल्ली कॅपिटल्सचा दमदार विजय! मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून मात





























































