IPL 2026 मध्ये अनलोल्ड राहिलेल्या खेळाडूची तोडफोड फलंदाजी, अवघ्या पाच धावांनी द्विशतक हुकलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL च्या १९व्या हंगामाची धामधूम सुरू असतानाच, एका युवा खेळाडूने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघात असलेल्या २० वर्षीय स्वास्तिक चिकाराला यावेळच्या मिनी ऑक्शनमध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मात्र, स्वास्तिकने अयोध्या प्रीमियर लीग २०२६ मध्ये ‘गोमती थंडर’ कडून खेळताना हिंडन टायटन्स विरुद्ध एक अविश्वसनीय खेळी साकारली आहे.

स्वास्तिक चिकाराने या सामन्यात अवघ्या ६९ चेंडूंमध्ये नाबाद १९५ धावांची वादळी खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या ५ धावांनी हुकले असले तरी, त्याने आपल्या डावात २१ षटकार आणि ११ चौकारांची आतिषबाजी केली. २८२.६१ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटत त्याने चाहत्यांना थक्क केले. त्याच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर गोमती थंडर संघाने २० षटकांत बिनबाद ३०७ धावांचा डोंगर उभा केला, जो टी-२० फॉरमॅटमधील एक दुर्मिळ विक्रम मानला जात आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी असलेल्या स्वास्तिकला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. २०२४ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा आणि २०२५ मध्ये आरसीबीचा भाग होता, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. यंदाच्या लिलावात ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर तो अनसोल्ड राहिला होता. मात्र, अशा प्रकारची खेळी करून स्वास्तिकने निवडकर्त्यांना आणि आयपीएल फ्रँचायझींना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.