
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता आयपीएल IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 2021 पासून 2025 पर्यंत अर्जुन मुंबई इंडियन्सचा भाग होता, मात्र या पाच वर्षांच्या कालावधीत त्याला केवळ 5 सामने खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर आता अर्जुनने संघात मिळणाऱ्या मर्यादित संधींबाबत आपले मौन सोडले असून, “कोणालाही बेंचवर बसून राहायला आवडत नाही,” अशा शब्दांत आपली खंत व्यक्त केली आहे.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना अर्जुनने मुंबई इंडियन्ससोबतच्या आपल्या प्रवासावर भाष्य केले. तो म्हणाला की, प्रत्येक खेळाडूला मैदानात उतरून आपली कामगिरी दाखवायची असते. जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तुला मुंबईकडून अधिक संधी मिळायला हव्या होत्या का? त्यावर अर्जुनने उत्तर दिले, “असे कोणाला वाटणार नाही? प्रत्येक खेळाडू मेहनत करतो आणि संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.” लखनौ सुपर जायंट्समध्ये त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून 6 व्या किंवा 7 व्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी अर्जुनने आयपीएलमधील वादग्रस्त Impact Player नियमावरही कडक टीका केली. हा नियम रद्द करून 11 खेळाडूंच्या क्रिकेट फॉरमॅटला त्याने पसंती दिली आहे. “आंतरराष्ट्रीय टी-20 किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये असा नियम नाही. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि तो तसाच खेळला जावा, मी वैयक्तिकरित्या या नियमाच्या विरोधात आहे,” असे त्याने स्पष्ट केले. आता नवीन संघात अर्जुनला स्वतःला सिद्ध करण्याची किती संधी मिळते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.




























































