IPL 2026 – लखनौचा जलवा की कोलकात्याचं कमबॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडन गार्डन्सवर गुरुवारी रंगणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जबरदस्त टक्कर होणार आहे. गुणतालिकेत झेप घेण्यासाठी दोन्ही संघ आतुर असून, चौकार-षटकारांचा पाऊस आणि थरार यांची चाहत्यांना मेजवानी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे या संघर्षात लखनौचा जलवा दिसतो की कोलकाता कमबॅक करतो याकडे लक्ष असेल.

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये लखनौचा वरचष्मा दिसतो. सहा लढतींपैकी चार वेळा त्यांनी कोलकात्याला धूळ चारली आहे. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला असला तरी, घरच्या मैदानावर कोलकाता हा हिशेब चुकता करण्यासाठी सज्ज आहे.

मात्र, यंदाचा हंगाम कोलकात्यासाठी डोकेदुखी ठरतोय. त्यांना अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यांना काही मोजक्या फलंदाजांवर अवलंबून राहावे लागत असून, फिरकी गोलंदाजही महागडे ठरत आहेत. शेवटच्या षटकांत वेगवान गोलंदाजांची गळचेपी ही मोठी चिंता ठरली आहे.

याउलट, लखनौने सुरुवातीचा धक्का सावरत जोरदार पुनरागमन केले आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघ धारदार दिसतोय. आघाडीच्या फळीतील फलंदाज आक्रमक, तर गोलंदाजी संयमी आणि अनुभवी आहे. त्यामुळे लखनौची घोडदौड सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

ईडनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. 200 धावसंख्या येथे सामान्य ठरते. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळाली तरी सामना पुढे सरकताच फलंदाज मोकळेपणाने धावा लुटतात. पावसाची शक्यता असल्याने सामना कमी षटकांचा झाल्यास पाठलाग करणाऱया संघाला फायदा होऊ शकतो.