
‘आयपीएल’च्या 14 व्या हंगामासाठी गुरुवारी चेन्नईत क्रिकेटपटूंचा मिनी लिलाव पार पडला. यात 22 परदेशी, तर 35 देशी खेळाडूंचे लिलाव झाले. ‘आयपीएल’मधील आठ संघमालकांनी क्रिकेटपटूंना खरेदी करण्यासाठी एकूण 145 कोटी 30 लाख रुपये खर्च केले. यातील सर्वाधिक 67 टक्के (97.7 कोटी) रक्कम 28 अष्टपैलू खेळाडूंवर खर्च झाली.
बंगळुरूने फलंदाजीची ताकद वाढली
यंदाच्या मिनी लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) ग्लॅन मॅक्सवेल व नव्या दमाचा मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूंना खरेदी करून आपल्या संघाची ताकद वाढविण्यावर भर दिला. कर्णधार विराट कोहलीसह एबी डिव्हिलियर्स व मॅक्सवेल असे क्रिकेटविश्वातील मातब्बर फलंदाज या संघाच्या दिमतीला आहेत. मधल्या फळीत काईल जेमिसन व डॅनियल ख्रिश्चियन असे अष्टपैलू खेळाडू आहेत.
राजस्थानचा संघ झालाय बलवान
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या इतिहासात 16 कोटी 25 लाख रुपयांच्या विक्रमी बोलीवर ख्रिस मॉरिसला खरेदी करून आपल्या संघाची ताकद वाढवली. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीतही हा खेळाडू महत्त्वाचा ठरू शकतो. शिवाय शिवम दुबेसारखा अष्टपैलू खेळाडूही घेतल्याने राजस्थानचा संघ बलवान बनला आहे.
अष्टपैलू फिरकीवर चेन्नईचा भरोसा
चेन्नई सुपरकिंग्जने ऑफस्पिनर गोलंदाजांना या लिलावात अधिक महत्त्व दिले. हरभजनला रिलीज करणाऱया या संघाने मोइन अली व कृष्णप्पा गौतम अशा उत्तम दर्जाच्या फिरकी गोलंदाजांवर विश्वास दाखवला. हे दोघे ऑफस्पिन गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही संघाच्या मदतीला येऊ शकतात.
कोलकाताने कमी पैशात घेतले चांगले खेळाडू
कोलकाता नाइट रायडर्सने विचारपूर्वक निर्णय घेत कमी पैशात अधिक चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यात यश मिळविले. राजस्थान रॉयल्सने एकटय़ा ख्रिस मॉरिससाठी जेवढे पैसे मोजले त्याच्या अर्ध्या रकमेत कोलकाता संघाने आठ खेळाडू खरेदी केले. यात शाकिब अल हसन व बेन कटिंग अशा अष्टपैलू खेळाडूंसह करुण नायरसारखा फलंदाज व हरभजन सिंगसारखा अनुभवी गोलंदाज आपल्या ताफ्यात घेतले.
पंजाबने मिळविले वेगवान गोलंदाज
पंजाब किंग्ज संघाने यंदाच्या लिलावात जे. रिचर्डसन व राइली मेरिडिथ अशा वेगवान गोलंदाजांना खरेदी केले. पंजाबला गतवर्षी मोहम्मद शमीच्या साथीला वेगवान गोलंदाजाची उणीव भासली होती. रिचर्डसन व मेरिडिथ ही जोडगोळी 140 हून अधिक वेगाने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे.
दिल्लीला स्वस्तात मिळाला मोठा खेळाडू
दिल्ली कॅपिटल संघाला स्टीव्हन स्मिथसारखा मोठा खेळाडू केवळ 2 कोटी 20 लाखांत मिळाला. फलंदाज आणि कर्णधार म्हणून हा खेळाडू संघाच्या मदतीला येऊ शकतो. याचबरोबर उमेश यादवसारखा अनुभवी गोलंदाजही एक कोटी रुपयात या संघाला मिळालाय.
मुंबईची गोलंदाजी बळकट
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला लसिथ मलिंगाच्या गैरहजेरीत त्याच्या तोडीचा वेगवान गोलंदाज हवा होता. त्यामुळे त्यांनी नाथन कूल्टर नाइल व ऍडम मिल्ने या गोलंदाजांना खरेदी केले. जेम्स नीशम व पियूष चावला यांनाही संघात घेऊन मुंबईने आपला गोलंदाजी ताफा बळकट करण्यावर भर दिला. अपेक्षेप्रमाणे अर्जुन तेंडुलकरही या संघात आला असून तोही एक डावखुऱया गोलंदाज आहे.


























































