
सामना ऑनलाईन । बंगळुरू
मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने हरवले. याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत ते आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवण्यासाठीच. रोहित शर्मा व विराट कोहली या दोन कर्णधारांमधील ही लढाई कोण जिंकतोय हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे.
कोहली, एबीला चमक दाखवावीच लागेल
गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव 70 धावांमध्ये गुंडाळून विजयाची भक्कम पायाभरणी केली. या डावात पार्थिव पटेल वगळता एकाही स्टार फलंदाजाला आपली चमक दाखवता आली नाही. जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्लेनघन, बेन कटिंग यांच्यासमोर विराट कोहली, ए. बी. डिव्हिलीयर्स या दिग्गज फलंदाजांना आपली धमक दाखवावीच लागणार आहे.
मलिंगाला मिळालीय क्लीन चिट
लसिथ मलिंगाला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून क्लीन चिट मिळालीय. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी ही आनंदाची बाब आहे. त्याशिवाय पहिल्या लढतीत दुखापतीला सामोरा गेलेल्या जसप्रीत बुमराहनेही नेटमध्ये सराव केलाय. त्यामुळे रोहित शर्मा ऍण्ड कंपनीचा विश्वास नक्कीच उंचावला असेल.
आजची लढत
मुंबई इंडियन्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, बंगळुरू, रात्री आठ वाजता


























































