Israel Iran War – इराणचा अमेरिकन तळांवर हल्ला; 6 सैनिकांचा मृत्यू, कुवैतमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून इराणने अमेरिकेच्या विविध लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी कुवैत, कतार आणि सौदी अरेबियातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. या भीषण संघर्षात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेक महत्त्वाच्या लष्करी सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

कुवैत येथील ‘शुएबा’ बंदरावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेचे ‘टॅक्टिकल ऑपरेशन सेंटर’ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याच ठिकाणी अमेरिकेचे सहा सैनिक शहीद झाले. याशिवाय, ‘अली अल सलेम’ एअर बेसवरील विमानांच्या हँगर्सचे नुकसान झाले आहे. तसेच ‘कॅम्प बुहरिंग’मधील इंधन साठा आणि देखभाल केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

इतर आखाती देशांमध्येही इराणने जोरदार हल्ले चढवले आहेत. कतारमधील ‘अल उदेद’ या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअर बेसवरील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तसेच, बहरीनमधील अमेरिकेच्या नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या मुख्यालयावरही हल्ला झाला असून, यामुळे नौदलाच्या कामकाजात मोठे अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय सौदी अरबमधील ‘प्रिन्स सुल्तान’ एअर बेसवर झालेल्या हल्ल्यात अमेरिकेची संपर्क यंत्रणा आणि इंधन भरणारी विमानांनाही याचा फटका बसला आहे. इराणच्या या आक्रमक निर्णयामुळे संपूर्ण आखाती देशांतील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

युद्धाचा भडका! अमेरिकन फायटर जेट पाडल्याचा इराणचा दावा, व्हाईट हाऊसकडून वृत्ताचे खंडन