
आखातातील इराण इस्त्रायलमधील युद्धाची तीव्रता आता वाढत आहे. इराणने आक्रमक पवित्रा घेत आता कोणतीही चर्चा होणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर इस्रायलने इराणवर हवाई हल्ल्यांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पाहचला आहे. त्यातच इराणमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तसेच या भूंकपाबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.
इराणमध्ये शुक्रवारी रात्री 8:49 मिनीटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी नोंदवण्यात आली. सेमनान शहराच्या आग्नेय दिशेने 78 किलोमीटर अंतरावर हा भूकंप नोंदवण्यात आला. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC), जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) आणि सिटिझन सिस्मोग्राफ नेटवर्क रास्पबेरीशेक यांनीही भूकंपाची पुष्टी केली आहे.
इराणी अधिकाऱ्यांनीही या भूकंपाची पुष्टी केली आहे. सेमनान आणि महदीशहर सारख्या भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र यामध्ये कोणच्याही प्रकारची हानी झालेली नाही. दरम्यान भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रावर सातत्याने हल्ले चढवले आहेत. तसेच इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ
ठार झाले आहेत. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. त्यातच इस्रायलने इराणच्या अणुकेद्रांवर केलेल्या हल्ल्यामुळे मोठा स्फोट झाला असवा आणि त्यामुळे हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इराण अण्वस्त्र कार्यक्रम राबवत असून त्या परीक्षणावेळी स्फोट होऊन भूकंपाचे हादरे बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अणुचाचणीनंतर जवळच्या भागात भूकंप जाणवतात. त्यामुळे आता या युध्दाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या हल्लांमुळे स्फोट होऊन हे हादरे बसले की इराणच्या अणु परीक्षण कार्यक्रमामुळे हादरे बसले किंवा खरोखरच नैसर्गिकपणे हा भूकंप झाला याबाबत तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहे.



























































