Israel Iran War – इराणचा इस्रायलवर पलटवार: हैफामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून इराण आणि इस्रायलमध्ये थेट संघर्ष सुरू झाला आहे. अमेरिकेसह इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य केल्यानंतर आता इराणने जोरदार पलटवार केला आहे. सोमवारी पहाटे तेहरानमधील बहारेस्तान भागात झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलच्या हैफा शहरावर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. या ताज्या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले असून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने रविवारी इस्रायलच्या दिशेने चार क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी एक क्षेपणास्त्र हैफा शहरातील एका रहिवासी अपार्टमेंटवर थेट कोसळले. या भीषण आघातामुळे इमारतीचा अर्धा भाग पत्त्यांसारखा कोसळला, तर उरलेला भाग अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकांनी रात्रभर मोहीम राबवली. सोमवारी सकाळपर्यंत चाललेल्या या मोहिमेत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून बेपत्ता असलेल्या अन्य दोन व्यक्तींचा शोध अद्याप सुरू आहे. इमारतीची स्थिती अस्थिर असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

हैफा हे उत्तर इस्रायलमधील तिसरे सर्वात मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर आणि माउंट कार्मेलच्या उतारावर वसलेले हे शहर इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येते. तसेच शेजारील लेबनॉनमधून हिजबुल्लाहकडून होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांचा धोकाही या शहराला सातत्याने असतो. सोमवारी सकाळी पुन्हा एकदा इराणकडून तीन क्षेपणास्त्रे येत असल्याचे इस्रायली रडारवर दिसून आले, ज्यामुळे संपूर्ण मध्य इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजू लागले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली.

इराण हादरले! तेहरानमधील रहिवासी भागांवर अमेरिका-इस्रायलचे भीषण हवाई हल्ले; 13 जणांचा मृत्यू

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणने डागलेली बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच रोखली आहेत, तर काही क्षेपणास्त्रे निर्मनुष्य आणि मोकळ्या मैदानावर पडली आहेत. हैफामध्ये ढिगाऱ्याखालील शोधकार्य सुरू असतानाच पुन्हा एकदा हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. या वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण परिसरात युद्धाचे ढग गडद झाले असून आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे.