
अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता अमेरिका आणि इराण एकमेकांचे कट्टर शत्रू वाटत असले, तरी इतिहासातील वास्तव याच्या अगदी उलट होते. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने भीषण हल्ले करून सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवले आहे, तोच इराण 1979 च्या क्रांतीपूर्वी अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र होता. इतकेच नव्हे, तर 1965 आणि 1971 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात अमेरिकेच्या सांगण्यावरून इराणने पाकिस्तानला लष्करी मदत केली होती. पाकिस्तानला त्यावेळी इराणकडून मदत मिळाली नसती तर आज पाकिस्तान नकाशावरच दिसला नसता.
1965 च्या युद्धात जेव्हा हिंदुस्थानने पाकिस्तानची कोंडी केली होती. त्यावेळी अमेरिकेच्या सांगण्यावरून इराणचे तत्कालीन शहा मोहम्मद रजा पहलवी यांनी पाकिस्तानसाठी ‘हथियार एजंट’ म्हणून काम केले होते. पाश्चात्य देशांकडून थेट शस्त्रास्त्रे मिळवण्यात पाकिस्तानला अडचणी येत असताना, शाह यांनी स्वतः पुढाकार घेतला. अमेरिकन गुप्तचर कागदपत्रांनुसार, इराणने पश्चिम जर्मनीकडून 90 एफ-86 (F-86) जेट विमाने, क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा खरेदी केला आणि तो गुपचूप पाकिस्तानपर्यंत पोहोचवला. यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांनंतरही पाकिस्तानची लष्करी शक्ती टिकून होती.
1971च्या बांगलादेश मुक्ती युद्धावेळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. हिंदुस्थानी नौदलाने कराची बंदर उद्ध्वस्त केल्यामुळे पाकिस्तानचा इंधन पुरवठा आणि लष्करी ताकद संपली होती. अशा वेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनी इराणला मध्यस्थी करण्यास सांगितले. निक्सन आणि शाह यांच्यातील गुप्त करारानुसार, इराणने पाकिस्तानला हेलिकॉप्टर आणि युद्धसाहित्य पुरवले. पाकिस्तानला दिलेल्या साहित्याचा मोबदला अमेरिका स्वतः देईल, अशी आश्वासन अमेरिकेने इराणला दिली होती.
युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा पाकिस्तानचा पराभव अटळ होता, तेव्हा पाकिस्तानने मदतीसाठी टाहो फोडला. मात्र, हिंदुस्थानने सोव्हिएत युनियनसोबत मैत्री करार केल्यामुळे इराणचे शाह थेट युद्धात उडी घेण्यास घाबरत होते. त्यांनी अमेरिकेला एक कल्पना सुचवली; त्यानुसार जॉर्डनची लढाऊ विमाने पाकिस्तानला पाठवण्यात आली आणि जॉर्डनच्या सुरक्षेसाठी इराणने आपली दोन विमाने तिथे तैनात केली. ही पडद्यामागची खेळी पूर्णपणे अमेरिकन प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली खेळली गेली होती.

























































