
मध्य पूर्वेमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हिंदुस्थानला रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेने हिंदुस्थानला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली आहे. 3 एप्रिलपर्यंत ही सूट देण्यात आली असून त्यानंतर हिंदुस्थान अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवेल, असे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे. यावेळी स्कॉट बेसेंट यांनी हिंदुस्थानचा उल्लेख ‘चांगले कलाकार’ असा केला. यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना ‘कॉम्प्रोमाइज्ड प्राईम मिनिस्टर’ म्हणत डिवचले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी हिंदुस्थानचे वर्णन खूप चांगला नट असे केले आहे. याचे कारण म्हणजे हिंदुस्थानने आधी रशियाकडून तेल न घेण्याचे मान्य केले होते आणि आता अमेरिकेच्या सवलतीनंतर हिंदुस्थान पुन्हा तेल खरेदी करणार आहे.
‘फॉक्स बिझनेस’शी बोलताना बेसेंट म्हणाले की, सध्याच्या संकटाच्या काळात पुरवठ्यातील शॉर्ट-टर्म अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने रशियन तेल खरेदीसाठी दिलेल्या या सवलतीमुळे जागतिक बाजारपेठेतील पुरवठ्याचा ताण कमी होण्यास मदत होईल. रशियाचे कच्चे तेल बऱ्याच काळापासून समुद्रात अडकले होते, आता याच कच्च्या तेलाची विक्री हिंदुस्थानला सुरू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.
जगात तेलाचा पुरेसा पुरवठा उपलब्ध आहे. ट्रेझरी विभागाने भारतातील आमच्या सहकाऱ्यांना रशियन तेल खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याचे मान्य केले आहे. हे तेल आधीच जहाजांवर उपलब्ध होते, असे बेसेंट म्हणाले. हिंदुस्थानी लोक खूप चांगले कलाकार आहेत. आम्ही त्यांना रशियावर बंदी घातलेले तेल खरेदी करणे थांबवण्यास सांगितले होते, त्यांनी ते मान्य केले. ते त्याऐवजी अमेरिकन तेल घेणार होते. परंतु, सध्याची तेलाची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही त्यांना रशियाकडून तेल घेण्याची परवानगी दिली आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसची टीका
दरम्यान, बेसेंट यांच्या विधानानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन का असा सवाल उपस्थित केला आहे. अमेरिकेचे हे पाऊल हिंदुस्थानसाठी अपमानजनक असल्याचे म्हणत काँग्रेसने केंद्राकडे उत्तर मागितले आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचे शब्द काय आहेत? ‘परवानगी’? तीही हिंदुस्थानला? 140 कोटी लोकसंख्येचा देश काय वॉशिंग्टनच्या मंजुरीची वाट पाहत आहे? ही एका तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांची किंमत आहे. हिंदुस्थानने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, जेणेकरून कोणतीही परकीय शक्ती आपल्यावर अटी लादू शकणार नाही. तरीही आज एका कमकुवत पंतप्रधानांच्या काळात अमेरिका उघडपणे हिंदुस्थानला ‘परवानगी’ देण्याबाबत बोलत आहे. ही मुत्सद्देगिरी नाही, हा अपमान आहे, असा घणाघात काँग्रेसने केला. हिंदुस्थानी लोक कोणाच्या स्क्रिप्टमधील ‘ॲक्टर’ नाहीत. पंतप्रधान मोदी, या विधानावर तुमचे मौन सुन्न करणारे आहे. हिंदुस्थानच्या जनतेला याचे उत्तर मिळालेच पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले.



























































