
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणण्याची जाहीर धमकी दिली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना स्पेनने पाठिंबा न दिल्याने आणि नाटोमधील आर्थिक योगदान वाढवण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांनी हे कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धात इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अमेरिकेला मित्रराष्ट्राने मोठा झटका दिला होता. स्पेनने आपल्या हवाई हद्दीतून अमेरिकन हवाई दलाच्या विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या या भीषण संघर्षात सामील न होण्याचा निर्णय स्पेन सरकारने घेतला होता. यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकले आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये जर्मन चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, स्पेनची वागणूक अत्यंत वाईट आहे. आम्ही स्पेनसोबतचा सर्व व्यापार बंद करणार आहोत. आम्हाला स्पेनशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत.
नाटो मित्रराष्ट्रांनी संरक्षण खर्च जीडीपीच्या 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या ट्रम्प यांच्या आवाहनाला स्पेनचे पंतप्रधान सांचेझ यांनी दिलेल्या नकारावरही त्यांनी बोट ठेवले. ट्रम्प यांच्या मते अमेरिका संरक्षणाचा नाहक भार उचलत आहे. म्हणूनच आम्ही स्पेनसोबतचा सर्व व्यापार बंद करणार आहोत. आम्हाला स्पेनशी कोणताही संबंध ठेवायचा नाही असे म्हणत ट्रम्प यांनी ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांना स्पेनसोबतचे सर्व व्यवहार थांबवण्यास सांगितल्याचे नमूद केले.
दुसरीकडे, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या कार्यालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन प्रशासनाला व्यापारी करारांची समीक्षा करायची असल्यास त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदे, खाजगी कंपन्यांची स्वायत्तता आणि ईयू-अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय करारांचा सन्मान राखला पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, दोन महायुद्धे आणि इराक-अफगाणिस्तान युद्धांमध्ये अमेरिकेची साथ देणाऱ्या ब्रिटननेही इराणवरील हल्ल्यात सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. मी ब्रिटनवर खुश नाही. पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या रूपाने आपण काही विन्स्टन चर्चिल यांच्याशी व्यवहार करत नाही आहोत, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, या घडामोडींमुळे आता अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील राजनैतिक संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“Not Winston Churchill we’re dealing with …”: Trump slams UK PM Starmer over Iran
Read @ANI Story I https://t.co/HPrRCNLC8C#DonaldTrump #WinstonChurchill #IranIsraelWar #KeirStarmer pic.twitter.com/DrMpj627PR
— ANI Digital (@ani_digital) March 3, 2026

























































