
इराणसाठी मंगळवार, ७ एप्रिल एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. एकीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करारासाठी दिलेली अंतिम मुदत आज संपत आहे, तर दुसरीकडे, इस्रायलने पुढील १२ तासांत इराणच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायली लष्कराने इराणी नागरिकांना रेल्वेचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. असे केल्यास तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल असे म्हणत उघडपणे धमकी दिलेली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराच्या ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पर्शियन चॅनलने इराणमधील रेल्वे प्रवाशांसाठी तातडीचा इशारा या शीर्षकाखाली एक पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे, “प्रिय नागरिकांनो, तुमच्या सुरक्षेसाठी, आम्ही विनंती करतो की आजपासून इराण वेळेनुसार रात्री ९ वाजेपर्यंत, तुम्ही संपूर्ण इराणमध्ये रेल्वेचा वापर आणि प्रवास करणे टाळावे. रेल्वे आणि रेल्वे मार्गांजवळ तुमची उपस्थिती तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल.” देण्यात आलेल्या या इशाऱ्या अंतर्गत कोणत्याही विशिष्ट भागाचा किंवा रेल्वे मार्गाचा उल्लेख नसल्यामुळे, धोक्याच्या नेमक्या स्वरूपाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणी अधिकाऱ्यांकडून याबाबत मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.



























































