
इराणचे नवीन सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खोमेनी हे सध्या अस्वस्थ असून, कोम या पवित्र शहरात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात त्यांचे वडील अली खोमेनी यांचा मृत्यू झाला होता आणि त्याच हल्ल्यात मोजतबा खोमेनी देखील जखमी झाले होते. ‘द टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ५६ वर्षीय धर्मगुरू सध्या बेशुद्ध अवस्थेत असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु करण्यात येत आहेत.
इराणच्या सर्वोच्च नेत्याचे ठिकाण उघड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोम हे मध्यवर्ती शहर तेहरानच्या दक्षिणेस ८७ मैल (सुमारे १४० किलोमीटर) अंतरावर वसलेले आहे. शिया इस्लाममध्ये या शहराला अत्यंत पवित्र मानले जाते आणि इस्लामिक प्रजासत्ताकाची धार्मिक राजधानी म्हणूनही ते ओळखले जाते. मोजतबा खोमेनी यांच्यावर कोम येथे अत्यंत गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. त्यामुळे राजवटीशी संबंधित कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास ते सध्या असमर्थ आहेत,” असे त्या दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे. हा दस्तऐवज अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी आखाती देशांमधील आपल्या मित्रराष्ट्रांशी सामायिक केलेल्या माहितीवर आधारित असल्याचे मानले जाते.
अयातुल्ला यांचे ठिकाण नक्की कुठे आहे, ही माहिती अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांना काही काळापासून ज्ञात होती. मात्र यापूर्वी ती कधीही सार्वजनिक करण्यात आली नव्हती, असेही या वृत्तात म्हटले आहे. अहवालानुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना एकापेक्षा जास्त कबरींसाठी कोममध्ये एक मोठे समाधीस्थळ बांधण्याची योजना असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. अली खोमेनी यांच्यासमवेत कुटुंबातील इतर सदस्यांनाही याठिकाणी दफन केले जाऊ शकते असे आता समोर येत आहे.
‘द टाइम्स’च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मोजतबा खोमेनी यांना त्या समाधीस्थळात दफन केले जाऊ शकते, ज्यामुळे इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची प्रकृती गंभीर असू शकते असे सूचित होते. वॉशिंग्टन किंवा तेहरान या दोघांनीही अहवालातील दाव्यांवर कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
इराणने पुष्टी केली आहे की, गेल्या पाच आठवड्यांहून अधिक काळ मध्य-पूर्वेला पेटवून देणाऱ्या युद्धाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हवाई हल्ल्यात, ज्यात त्यांचे वडील, आई, पत्नी झहरा हद्दाद-अदेल आणि त्यांचा एक मुलगा ठार झाले, त्याच हल्ल्यात धाकटे खोमेनी जखमी झाले होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला वडिलांचे उत्तराधिकारी म्हणून निवड होऊनही, युद्ध सुरू झाल्यापासून नवीन सर्वोच्च नेते सार्वजनिकरित्या दिसलेले नाहीत किंवा त्यांच्याबद्दल काहीही ऐकू आलेले नाही. खोमेनी यांच्या नावाने अनेक वक्तव्ये इराणी सरकारी दूरचित्रवाणीवर वाचून दाखवण्यात आली आहेत, परंतु त्यांच्या आवाजाची ध्वनिमुद्रित प्रत उपलब्ध नसल्यामुळे, त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या पडताळणी न झालेल्या वृत्तांना अधिक बळ मिळत आहे.


























































