Iran Israel War – मृतदेहांचा खच आणि विध्वंसाचे तांडव; इराण-इस्रायल संघर्षात आखाती देश होरपळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या एका महिन्यात या संघर्षाची व्याप्ती वाढली असून यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध देशांनी आणि आरोग्य यंत्रणांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा हजारोंच्या घरात पोहोचला आहे. लष्करी आणि बचाव संस्थांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार या युद्धजन्य परिस्थितीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे.

युद्धाचा वाढता भडका आणि जीवितहानी
गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांपासून या युद्धाला सुरुवात झाली. या पहिल्याच हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला. ताज्या आकडेवारीनुसार, इराणमध्ये 3,200 हून अधिक, तर लेबनॉनमध्ये 1,00 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

आखाती देशांना बसलेला फटका
हे युद्ध केवळ इराण आणि इस्रायलपुरते मर्यादित राहिलेले नाही. इराणने संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवैत आणि कतार यांसारख्या शेजारील देशांमधील तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि विमानतळांना लक्ष्य केले आहे. कुवैतमधील एका वीज प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुबई आणि अबु धाबी सारख्या पर्यटन केंद्रांवरही हल्ल्यांचे सावट असल्याने या भागातील अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
इराणने जगातील महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधनी’ (Strait of Hormuz) बंद केल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 115 डॉलरच्या पार गेले आहेत. यामुळे हिंदुस्थान, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या आशियाई देशांमध्ये महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या पाकिस्तान या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्लामाबादमध्ये सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या नव्या नेतृत्वाशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत, मात्र अद्याप जमिनीवर युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.