रुपयाची लोळण, 95चा नीचांक! निर्मलाताई म्हणतात, रुपया ठीक चल रही है!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने घसरणाऱ्या रुपयाने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अक्षरशः लोळण घेतली. रुपयाच्या किमतीने प्रतिडॉलर 95 रुपयांचा नीचांक गाठला. असे असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र लोकसभेत अजब दावा केला. ‘रुपया ठीक चल रही है,’ असे त्यांनी बेधडकपणे सांगितले.

गेल्या महिनाभरात रुपयाचे मूल्य 4.1 टक्क्यांनी घसरले आहे. सोमवारी या घसरणीने नवा नीचांक गाठला. सोमवारी दिवसभरात 88 पैशांनी कोसळून रुपया डॉलरमागे 95.58 पर्यंत आला आणि दिवसअखेर 94.78 वर बंद झाला. रुपयाच्या या स्थितीबाबत लोकसभेत सरकारला प्रश्न विचारण्यात आला. सीतारामन यांनी त्यावर उत्तर दिले.

‘सध्या होत असलेली चलनांच्या मूल्यातील घसरण ही रुपयापुरती मर्यादित नाही. इतर देशांच्या चलनातही घसरण होत आहे. मात्र त्यांच्या तुलनेत आपल्या रुपयाची स्थिती खूप चांगली आहे. आरबीआय रुपयाच्या किंमतीवर लक्ष ठेवून आहे, असे सीतारामन म्हणाल्या. हे सांगताना त्यांनी दक्षिण कोरिया, थायलंड, फिलिपीन्सच्या चलनांचा दाखला दिला. ‘हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मजबूत आहे. आपल्या वित्तीय व्यवस्थापनाचे जगात कौतुक होत आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

g मावळत्या आर्थिक वर्षात रुपया जवळपास 10 टक्क्यांनी घसरला आहे. ही गेल्या 13 वर्षांमधील सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. एकीकडे युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला असून गॅस टंचाईमुळे जनता हवालदिल झाली आहे. मात्र मोदी सरकारला कोसळता रुपया सावरण्यात पूर्णपणे अपयश आले आहे.

आशियातील सर्वात कमकुवत चलन

काँग्रेसने ‘एक्स’ पोस्ट करून निर्मला सीतारामन यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. रुपयाच्या घसरणीचा आलेख दाखवत काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘हिंदुस्थानी रुपया हे आशियातील सर्वात कमकुवत चलन आहे. मोदींच्या राजवटीत रुपयाने सर्वात खराब कामगिरी केली आहे,’ अशी टीका काँग्रेसने केली.