
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या आखाती शेजारील देशांना अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “जर तुम्हाला तुमच्या देशाचा विकास आणि सुरक्षा अबाधित ठेवायची असेल, तर आमच्या शत्रूंना (अमेरिका आणि इस्रायल) इराणवर हल्ला करण्यासाठी स्वतःची जमीन किंवा हवाई क्षेत्र वापरू देऊ नका,” असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पाजेश्कियान यांनी म्हटले आहे.
इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने सौदी अरेबिया, युएई, कुवेत आणि कतार यांसारख्या आखाती देशांना उद्देशून हा संदेश दिला आहे. इराणने म्हटले आहे की, आखाती देशांनी गेल्या काही वर्षांत जो आर्थिक विकास साधला आहे, तो केवळ शांततेमुळेच शक्य झाला आहे. जर या देशांनी अमेरिकन सैन्याला इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी आपल्या तळांचा वापर करू दिला, तर ही सुरक्षा आणि विकास एका क्षणात धोक्यात येईल. इराणने थेट बजावले आहे की, अशा परिस्थितीत केवळ हल्लेखोर देशच नाही, तर त्यांना सहकार्य करणारे देशही इराणच्या निशाण्यावर असतील.
आखाती देशांमध्ये अमेरिकेचे अनेक मोठे लष्करी तळ आहेत. इराणला भीती आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिका या तळांवरून इराणवर मोठे हवाई हल्ले करू शकते. याच भीतीपोटी इराणने आता प्रतिबंधात्मक दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. कुवेत आणि दुबईवर झालेल्या ताज्या ड्रोन हल्ल्यांमुळे इराणचा हा इशारा केवळ शाब्दिक नसून तो प्रत्यक्ष कारवाईत बदलू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
इराणच्या या भूमिकेमुळे जागतिक तेल बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. जर आखाती देशांमध्ये युद्ध भडकले, तर कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे कोलमडू शकतो.
We have said many times that Iran doesn’t carry out preemptive attacks, but we will retaliate strongly if our infrastructure or economic centers are targeted.
To the countries of the region:
If you want development and security, don’t let our enemies run the war from your lands.— Masoud Pezeshkian (@drpezeshkian) March 28, 2026


























































