शेवटच्या गोळीपर्यंत लढणार! इराणचा आरपारच्या लढाईचा इरादा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन-इस्रायल हल्ल्याविरुद्ध देशाचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या सैनिकापर्यंत देश विरोध करेल, लढत राहील, अशी आम्ही शपथ घेतली आहे, असा निर्धार इराणने केल्याचे इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी सांगितले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘रायसीना डायलॉग’मध्ये ते बोलत होते.

अमेरिकेने इराणमध्ये सैन्य घुसवल्यास जमिनीवरील युद्धासाठी इराण सज्ज असून शस्रसंधीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराग्ची यांनी स्पष्ट केले, तर इराणच्या विरोधात उभे असलेल्यांना येणाऱ्या काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझाश्कियान यांनी दिला आहे.

खतीबजादेह म्हणाले, इराण सध्या पूर्णपणे युद्धाच्या परिस्थितीतून जात आहे. जेव्हा आपण बोलत आहोत, तेव्हा माझ्या सहकारी नागरिकांवर अमेरिका-इस्रायलचा सतत हल्ला होत आहे. मला वाटते की, सध्या इराणसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इराणने हल्ल्यांचा कडाडून विरोध करायला हवा. ही इराणच्या अस्तित्वाची लढाई आहे. काही शक्ती इराणला संपवू इच्छितात. आम्ही हल्लेखोरांना मागे ढकलण्यासाठी आमच्या देशाच्या संरक्षणाची लढाई लढत आहोत.

आमच्याकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाही – इराणची स्पष्ट भूमिका

आम्ही कोणत्याही प्रकारचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिलेला नाही, देणारही नाही, अशी स्पष्ट भूमिका इराणचे परराष्ट्रमंत्री अराग्ची यांनी एका मुलाखतीत मांडली. त्यांनी सांगितले की, अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्याचे कोणतेही कारण नाही. गेल्यावेळी उलट इस्रायलनेच 12 दिवसांच्या संघर्षानंतर विनाअट शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता. त्यांच्या आक्रमणाला आम्ही कडवा प्रतिकार केला होता. अमेरिकेने जमिनीवरून आक्रमण केल्यास आम्ही त्यांच्या प्रतीक्षेतच आहोत. आम्ही त्यांचा प्रतिकार करू. हे त्यांच्यासाठी मोठे संकट ठरेल, असा आत्मविश्वास अराग्ची यांनी व्यक्त केला.

हा जगासाठी धोका

एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करणे हे धोकादायक आहे. जर हे नवीन सामान्य बनले, तर जगासाठी गंभीर धोका निर्माण होईल, असे खतीबजादेह म्हणाले. ट्रम्प इराणमध्ये नेतृत्व बदलण्याची चर्चा करतात, पण ते न्यूयॉर्कच्या महापौरांनाही नियुक्त करू शकत नाहीत. ही एकप्रकारे वसाहतवादी भूमिका आहे. ते स्वतःच्या देशात लोकशाहीची चर्चा करतात, पण इराणच्या लोकशाही सरकारला पाडू इच्छितात.

विनाअट शरण या, तोपर्यंत डील नाही – ट्रम्प

विनाअट शरण येत नाही, तोपर्यंत इराणसोबत कोणतीही डील होणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. शरण आल्यानंतर इराणमध्ये एक चांगले नेतृत्त्व निवडले जाईल. इराणला आर्थिकदृष्टया भक्कम करण्यासाठी मित्र राष्ट्राच्या साथीने अमेरिका काम करेल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

खैबर शेकन-4 क्षेपणास्त्र डागणार; परिणामांसाठी तयार रहा!

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझाश्कियान यांनी अमेरिका आणि इस्रायलला युद्धाचे परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा दिला. आता आमची नव्या तंत्रज्ञानाची अत्याधुनिक क्षेपणास्त्रs जगाला दिसतील. खैबर शेकन-4 या क्षेपणास्त्रांचा आखातात मारा करण्यात येईल. निशाण्यावर अमेरिका आणि इस्रायलचे तळ असतील, असे त्यांनी नमूद केले.

इराणी हिसका… इस्रायलचे अनेक सैन्य अधिकारी ठार

इराणने इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या परिसरावर मोठा हल्ला केला, त्यात इस्रायलच्या सैन्यदलातील अधिकारी तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेचे इस्रायलने टाकलेल्या निर्बंधामुळे थेट प्रक्षेपण झाले नाही. या घटनेशी संबंधित काही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यात आले असून मोठा विध्वंस झाल्याचे त्यात दिसत आहे.

देशाच्या सर्वोच्च नेत्यालाच बाहेरची शक्ती लक्ष्य करत असेल तर हे केवळ इराणसाठी नाही तर जगासाठी धोकादायक आहे. इराणला संपवण्याचे हल्लेखोर देशांचे इरादे आहेत. इराणसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही कुणावरही आक्रमण केलेले नाही. त्यामुळे युद्ध थांबणार की नाही याचा विचार हल्लेखोरांनी करावा. – सईद खतीबजादेह, उपपरराष्ट्रमंत्री, इराण