ट्रेन प्रवासात लोअर बर्थ कसा मिळवावा ? IRCTC ने दिलं तपशीलवार उत्तर

रेल्वे प्रवासादरम्यान विंडो सीट मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. खिडकीवाली सीट असेल तर लांब पल्ल्याच्या प्रवासात तुम्हाला लोअर बर्थ मिळतो. मिडल आणि अप्पर बर्थपेक्षा लोअर बर्थला प्रवाशांचं प्राधान्य असतं. लोअर बर्थमुळे आपल्याला कोणाचा त्रास होत नाही आणि आपल्यामुळे इतरांनाही त्रास होत नाही. अशा या लोअर बर्थसाठी सगळेच प्रवासी आग्रही असतात, मात्र तो मिळतो काही ठराविक लोकांनाच. तुम्हाला लोअर बर्थच हवा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याचं उत्तर IRCTC ने दिलं आहे.

रेल्वेच्या आरक्षणामध्ये लोअर बर्थसाठी वयोवृद्धांना प्राधान्य दिलं जातं. वरिष्ठ नागरिकांना बरेच प्रयत्न करूनही हा बर्थ मिळत नाही. एका ट्विटर वापरणाऱ्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत लोअर बर्थ कसा वितरीत केला जातो? त्यामागची प्रक्रिया काय असते असा प्रश्न विचारला होता. प्रश्नकर्त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की त्याने 3 वरिष्ठ नागरिकांसाठी 3 सीट बुक केल्या होत्या आणि तिघांसाठी लोअर बर्थचाच पर्याय निवडला होता. मात्र त्यांना मिडल बर्थ, अप्पर बर्थ आणि साईड लोअर बर्थ देण्यात आले होते. लोअर बर्थचा पर्याय स्वीकारूनही या तिघांना असे बर्थ का मिळाले असा प्रश्न ट्विटर वापरणाऱ्याने विचारला होता. याला IRCTC ने उत्तर दिलं आहे.

आयआरसीटीसीने म्हटलंय की लोअर बर्थसाठी प्राधान्य क्रम ठरवण्यात आला असून यामध्ये 60 वर्षांवरील नागरीक, 45 वर्षांहून अधिक वयाच्या महिला यांना हा बर्थ प्राधान्याने दिला जातो, मात्र एक किंवा दोन प्रवासी प्रवास करत असतील तर त्यांनाच याचा फायदा उचलता येतो. दोन प्रवाशांमध्येही जर एक प्रवासी हा वरिष्ठ नागरीक नसेल किंवा 45 पेक्षा जास्त वय असलेली महिला नसेल तर त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकालाही लोअर बर्थसाठी प्राधान्य दिलं जात नाही. जर दोन वरिष्ठ नागरीक एकत्र प्रवास करत असतील तरच त्यांना ही सुविधा दिली जाते.