संगमेश्वर तालुक्यातील पाणलोट विकास कार्यक्रमाचा उडाला बोजवारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे. डी. पराडकर । देवरुख

संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयाचा अनागोंदी कारभार नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकवेळा या कार्यालयाच्या अनेक विषयांवरुन खडाजंगी होत असते. तालुका कृषी कार्यालयाच्या नाकर्तेपणामुळे संगमेश्वर तालुक्यातील पाणलोटला घरघर लागली आहे. पाणलोटच्या या अवस्थेला तालुका कृषी अधिकारीच जबाबदार असल्याची टीका तालुक्यातील पाणलोट समित्यांकडून केली जात आहे.

संगमेश्वर तालुक्यामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम गेली ५ वर्षे सुरु आहे. तालुक्यातील बहुतांशी गावे ही तालुका कृषी कार्यालयाच्या अखत्यारीत येतात. या गावांमध्ये राबविण्यात येणारा पाणलोट विकास कार्यक्रम कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसारच राबविला जातो. गेली कित्येक वर्षे तालुक्यातील हा पाणलोट विकास कार्यक्रम राबविला जात आहे. पाणलोटच्या सुरुवातीपासूनच अध्यक्ष बदलावरुन पाणलोटमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या दरम्यान काही समित्यांचे अध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अध्यक्ष नेमणुकीबाबतचा तिढा सुटला. यानंतर पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या विविध टप्प्यांचे कामकाज सुरु झाले होते.

विविध टप्प्याचे कामकाज सुरु असतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे तालुका कृषी विभागाकडून पाणलोट समित्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या जात होत्या आणि कामकाज करण्यात येत होते. सुरुवातीपासूनच पाणलोट समित्यांना आलेले आदेश तालुका कृषी प्रमुखांना सांगण्यात येत होते. किंबहुना समित्यांना नेहमीच विश्वासात घेऊन हा उपक्रम सुरु होता. शेवटच्या टप्प्यात असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत सध्या कृषी कार्यालयाचा उदासिनपणा दिसून येत आहे. या कार्यालयाच्या एकूणच ढीसाळ कारभाराची लक्तरे प्रत्येक आमसभेत निघतांना दिसतात. यापूर्वी देखील काही समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी कार्यालयावर धडक देवून जाब विचारल्याच्या घटनाही घडल्या. तालुक्यातील शेंबवणे येथील निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधण्यात येत होते त्याचे काम अत्यंत निकृष्ट होत असल्याची तक्रार अमित ताठरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. जागामालकाची कोणतीही परवानगी न घेता हा बंधारा उभारण्यात येत होता. या निकृष्ट बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. यासह अनेक गावातील पाणलोट बंधारे निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात वाहून गेले. पाणलोटच्या कारभाराबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न देखील उपस्थित झाले होते. अशा संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयाच्या चाललेल्या बेदरकार कारभाराबाबत विभागीय अथवा जिल्हा पातळीवरचे अधिकारी दखल का घेत नाही ? असा सवाल समित्यांसह ग्रामस्थांनाही पडला आहे.

सध्या या तालुका कृषी कार्यालयाकडून पाणलोट विकास कार्यक्रम बंद करण्याबाबत तोंडी सूचना पाणलोट सचिवांना दिल्या जात आहेत. पाणलोट कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी आणि विविध टप्प्यांवर काम करतांना समितीकडे रितसर पत्रव्यवहार करुन हा कार्यक्रम सुरु होता. मात्र कार्यक्रम बंद करतांना समित्यांना विश्वासात का घेतले जात नाही? तसेच सचिवांना केवळ तोंडी सूचना का दिल्या जात आहेत? असे अनेक प्रश्न तालुका कृषी कार्यालयाच्या कारभाराबाबत निर्माण होत आहेत.

कॉंक्रीटीकरण, वळणबंधारे अशी कामे देखील झालेली नाहीत. वैयक्तीक लाभाची रक्कम देखील या कार्यालयाने लाभार्थ्यांना दिलेली नाही. प्रकल्पाची मुदत संपली असल्याचे सांगत या कार्यालयाकडून समितीच्या खात्यावरुन रक्कम मागून घेतली जात आहे. या अजब कारभाराबाबत काही समित्या अनभिज्ञ आहेत. तर काही याबाबत लवकरच जाब विचारण्याच्या तयारीत आहेत.

पूर्ण झालेले काही बंधारे सुस्थितीत असतांनाही या बंधाऱ्यांची सुरक्षा अनामत ठेव दोन वर्षे होवून देखील नियमबाह्यरित्या कार्यालयाच्या वरिष्ठांनी मुद्दामहून अडकवून ठेवली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी बी. जी. कदम यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाहणी करुन अहवाल मागविण्यात येइल अशी माहिती दिली. एकंदरीत संगमेश्वर तालुक्यातील पाणलोट विकास कार्यक्रमाला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.