…तर हिंदुस्थानला उत्तर देऊ! मोहसीन नक्वी यांची दर्पोक्ती,पाकड्यांचे शेपूट वाकडेच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये शिया मशिदीत झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. या हल्ल्यांसाठी हिंदुस्थानला जबाबदार धरत आम्ही हिंदुस्थानला उत्तर देऊ, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी केली आहे.

इस्लामाबादच्या तुर्लाई कलान परिसरातील खादीजा तुल ​​कुबरा मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान आत्मघाती हल्ला झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की 31 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. याबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की मशिदीच्या सुरक्षा रक्षकांनी संशयित हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराने प्रथम त्यांच्यावर गोळीबार केला आणि नंतर उपासकांमध्ये स्वतःला उडवून दिले. त्यानंतर त्यांनी दावा केला की हल्लेखोर अफगाणिस्तानातून आला होता. दहशतवादी संघटना इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर हल्लेखोराचा फोटो प्रसिद्ध केला.

एवढे सर्व स्पष्ट असताना पाकड्यांनी हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांना पाकिस्तान या हल्ल्याविरोधात काही कारवाई करणार आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, पाकिस्तानने कधीही दहशतवादाचे समर्थन केलेले नाही. हिंदुस्थानला आम्ही उत्तर देऊ, अशी दर्पोक्ती त्यांनी केली. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान अशी पाकिस्तानशी जगात ओळख आहे. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे असतानाही त्यांनी हिंदुस्थानला लक्ष्य केले आहे. त्यामुळे पाकड्यांचे शेपूट वाकडेच, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.