इस्लामी विचारधारा अमेरिकेसाठी धोका, तुलसी गबार्ड यांचा इशारा

इस्लामी विचारसरणी ही व्यक्तिगत स्वातंत्र्य व पाश्चात्त्य लोकशाही मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात असून अमेरिकेसाठी हा मोठा धोका आहे,’ असे स्पष्ट मत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी मांडले आहे.

ऑरिझोना येथे टार्निंग पॉइंट यूएसएच्या अमेरिका फेस्टला संबोधित करताना त्या बोलत होत्या. ‘इस्लामी विचारसरणीचा संबंध धर्माशी नसून ती एक राजकीय विचारसरणी आहे. शरिया कायद्यानुसार संपूर्ण जगात खिलाफत स्थापन करणे हा या विचारधारेचा उद्देश आहे. ही विचारधारा केवळ काही देशांपुरती मर्यादित नाही, तर अमेरिकेतही ती मूळ धरत आहे. ही विचारसरणी आपल्या स्वातंत्र्यासाठी थेट धोका आहे, असे त्या म्हणाल्या.

वेळीच सावध होणे गरजेचे!

‘अमेरिकेने वेळीच या विचारसरणीला ओळखले नाही आणि त्याविरुद्ध पावले उचलली नाही तर देशात युरोप आणि ऑस्ट्रेलियासारखी परिस्थिती येऊ शकते. आपण वेळीच कृती केली नाही तर अमेरिका अडचणीत येईल. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने असलेल्या देशांसारखी अमेरिकेची स्थिती होईल,’ असा इशारा त्यांनी दिला. ‘जर्मनीमध्ये ख्रिसमस मार्केट बंद केले जात आहेत, तर ब्रिटनमध्ये रस्त्याच्या कडेला शांतपणे प्रार्थना केल्याबद्दल लोकांना अटक केली जात आहे,’ याकडेही गॅबार्ड यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेत कट्टरपंथीकरणाचे आरोप

अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कट्टरपंथी इस्लामिक धर्मगुरू उघडपणे तरुणांना भडकावत आहेत आणि त्यांचा ब्रेनवॉश करत आहेत. डियरबॉर्न (मिशिगन) आणि मिनियापोलिस (मिनेसोटा), पॅटरसन (न्यू जर्सी) आणि ह्युस्टन (टेक्सास) येथेही हे प्रकार घडत असल्याचे गॅबार्ड म्हणाल्या. ‘या विचारधारेचे लोक केवळ सेन्सॉरशिपचाच नव्हे तर विरोधी आवाज दाबण्यासाठी हिंसाचार आणि धमक्यांचाही आधार घेतात. सोशल मीडिया पोस्ट आवडली नाही तरी लोकांना धमक्या दिल्या जातात,’ असेही त्यांनी सांगितले.