पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयाने मिळवले आय. एस. ओ. ९००१ : २०१५ मानांकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

नाशिक विभागातील पहिले आय. एस.ओ. ९००१:२०१५ हे मानांकन मिळवण्याचा मान येथील पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयाने मिळवला असून ग्रामीण भागातील कार्यालयाने हा मान पटकावल्याने येथील महसूलच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथर्डी येथील प्रांताधिकारी कार्यालया मार्फत शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील महसूलचे काम पहिले जात असून सध्या कार्यरत असलेले प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी येथील कार्यालयाची २९ मे २०१७ रोजी सूत्रे हाती घेतली होती. पदभार घेतल्यानंतरच्या एक वर्षाच्या काळात बांदल यांनी भूसंपादन, जातीचे व नॉनक्रिमिलियरचे मिळून जवळपास ४५ हजार दाखले देण्याचे काम केले. या शिवाय २०० अपील व रिव्हिजन निकाली काढले तसेच तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन सुद्धा वेळेत केले. बांदल यांनी या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याने गतिमान प्रशासनाची अनुभूती नागरिकांना आली. आपल्या कार्यालयाला आय. एस. ओ. नामांकन मिळावे या साठी त्यांनी व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार डी. सी. लोखंडे, अव्वल कारकून योगिता सुतार, लिपिक विश्वेश्वर खेडकर, दीपक चन्ने, अर्चना गर्जे यांनी मोठे प्रयत्न केल्यानंतर आय. एस. ओ. हे मानांकन देणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅन्डर्डायझेशन या संस्थेचे परीक्षक ओमकार पत्की यांनी आपल्या सहकार्यांसह येथील कार्यालयाचे परीक्षण करत या कार्यालयाला आय. एस. ओ. हे मानांकन दिले.

या परीक्षणामध्ये त्यांनी कार्यालयातील दप्तर नेमके कशा पद्धतीने ठेवले आहे. नागरिकांसाठी माहितीदर्शक फलक लावलेला आहे कि नाही, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदनामदर्शक फलक व त्यांच्याकडे असलेल्या कामाची कर्तव्य सूची लावली आहे कि नाही, पार्किंग व्यवस्था कशी आहे, पिण्याच्या पाण्याची सोय, कार्यालयात लावलेले माहिती फलक, नागरिक व अधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था, परिसरातील स्वछता व वृक्षरोपण, अग्निशामक व्यवस्था आदींचे परीक्षण करत हे मानांकन येथील प्रांत कार्यालयाला दिले असून नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार व धुळे या पाचही जिल्ह्यात आय. एस. ओ. हे मानांकन मिळवणारे पहिले पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालय होण्याचा मान पटकावला आहे.