
इस्रायल आणि हमास यांच्यातील नुकत्याच लागू झालेल्या शस्त्रसंधीचा भंग करून इस्रायली हवाई दलाने गाझा पट्ट्यातील घनदाट वस्त्यांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान १०४ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ४६ मुले आहेत. या हल्ल्यात २५३ जण जखमी झाले आहेत. हा शस्त्रसंधीचा मोठा भंग असून, ९ ऑक्टोबरला लागू झालेल्या करारानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचे समर्थन करत म्हटले की, “इस्रायलने आपल्या सैनिकाच्या हत्येला प्रत्युत्तर दिले आहे. हल्ल्याने शस्त्रसंधीला धोका नाही.”
इस्रायली हवाई दलाने गाझा सिटी, खान युनिस, बेत लाहिया आणि अल-बुरेज या भागांवर बॉम्बिंग केली. खान युनिसमध्ये एका वाहनावर केलेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी दोन मुले होती.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरला शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर इस्रायली हल्ल्यांमध्ये एकूण २११ पॅलेस्टिनी मारले गेले आणि ५९७ जण जखमी झाले आहेत. तसेच ४८२ शव सापडली आहेत. गेल्या दोन वर्षांत चालू असलेल्या संघर्षात ६८,५०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत.




























































