
इस्रायलमध्ये एका गुहेत सुमारे 3300 वर्षांपूर्वीचा खजिना सापडला आहे. मंगळवारी इस्रायलमधील एका समुद्र किनाऱ्यावरील गुहेत हा खजिना आढळून आला आहे.
इस्रायलच्या अँटिक्युटिज ऑथॉरिटी अर्थात आयएएच्या एका पथकाला ही गुहा आढळली. या पथकातील एक तंत्रज्ञ प्लामाहिम नॅशनल पार्कच्या छताच्या भागावर काम करत होता. तेव्हा त्याचं लक्ष या गुहेकडे गेलं. या गुहेत काहीतरी असावं असा त्याला संश आला. तेव्हा त्याने हे त्याच्या पथकाला सांगितलं.
या गुहेचा आकार चौकोनी होता. त्यात अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या. या वस्तु कांस्य युगातील असून त्याकाळी करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारांच्या पद्धतींवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. या गुहेत जे सामान मिळालं, ते अतिशय दुर्मीळ गटात येतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. ही गुहा आढळणं हेही अतिशय दुर्मिळ आहे. कारण, संशोधकांना त्यांच्या आयुष्यात फार कमी वेळा अशा प्रकारचा ऐवज हातात लागतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
या सगळ्या खजिन्याचं नातं इजिप्तशी आहे. या खजिन्यात प्रामुख्याने भांडी सापडली आहेत. यातील प्रमुख भांडी ही जेवण बनवण्याच्या कामी येणारी आहेत. त्यातील काहींवर लाल रंग फासलेला आहे. ही भांडी इजिप्तचा राजा फिरॉन रामेसेस दुसरा याच्या काळातील म्हणजे इसवी सन पूर्व 1213 मधील आहेत. या भांड्यांतील काहींमध्ये वस्तु सुरक्षित ठेवता येण्याएवढी जागा आहे. तसंच, जुन्या पद्धतीचे दिवे, बाण आणि भाले देखील यात आढळले आहेत.

























































