
अमेरिका-इराणमध्ये दोन आठवडच्या युद्धविरामाची घोषणा झाली आणि जगभरात त्याचे स्वागत झाले. यामध्ये अमेरिकेचा सहकारी इस्रायलने देखील सोशल मीडिया अकाउंटवरून इराण विरोधात कारवाई दोन आठवडे थांबवण्यास जाहीर पाठिंबा दिला. पण असे असले तरी आतमध्ये बरीच धूसफूस सुरू असल्याचे कळते आहे.
इंग्रजी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत इस्रायलने नाराजी व्यक्त केली आहे. या वाटाघाटींमधून इस्रायलला बाहेर ठेवण्यात आले आणि त्यांचा कोणताही सल्ला न घेता कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले, असे या वृत्तात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली ‘आज रात्री संपूर्ण संस्कृती नष्ट होईल’ ही मुदत संपण्यास अवघे ९० मिनिटे शिल्लक असताना, बुधवारी पहाटे दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला. या अंतर्गत इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास संमती दर्शवली. यामुळे जगभरातील इंधन पुरवठा सुरळीत होण्याची आशा निर्माण झाली होती.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या निर्णयाला वरवर पाठिंबा दर्शवला असला तरी, ‘X’ वर स्पष्ट केले की, ‘या दोन आठवड्यांच्या युद्धविरामात लेबनानचा समावेश नाही.’ इस्रायलने लेबनानमध्ये हिजबुल्ला विरुद्ध आपली लष्करी मोहीम सुरूच ठेवली आहे. यावर इराणने तीव्र आक्षेप घेतला आहे.
इराणची धमकी आणि सामुद्रधुनी पुन्हा बंद
इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्यास अमेरिकेसोबत केलेल्या युद्धविराम करारातून बाहेर पडण्याची धमकी इराणने दिली आहे. करारात जलमार्ग खुला करण्याचे आश्वासन दिले असूनही, इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने पुन्हा एकदा तेलवाहू जहाजांची वाहतूक रोखल्याचे इराणच्या प्रसारमाध्यमांनी कळवले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलच्या लेबनॉनमधील कारवाईचे समर्थन केले आहे. ‘पीबीएस न्यूज’शी बोलताना ते म्हणाले की, ‘हिजबुल्लाचा या करारात समावेश नव्हता, हे सर्वांना माहित आहे. ती एक वेगळी लढाई आहे. त्याचीही काळजी घेतली जाईल’.
दरम्यान, आता होर्मुस पुन्हा बंद झाल्याने चर्चेबाजूला राहून युद्धासारखी परिस्थिती निर्माण होणार का अशी चिंता व्यक्त होत आहे.



























































