
दा. पृ. सोमण,[email protected],अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद ठाणे
काही वर्षांपूर्वी आपल्या इस्रोने चंद्रावरून पाणी आणले… आता अत्यंत दुर्मीळ अशी अणुऊर्जा आणण्याचा खटाटोप चालवलाय…
मित्रांनो, आज तुम्हाला मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा अभिमान वाटावा, गर्व वाटावा अशी बातमी आहे
चंद्र हा मनाला ऊर्जा देणारा आहे, प्रेमाला ऊर्जा देणारा आहे, सागराला ऊर्जा देणारा आहे, वनस्पतींना ऊर्जा देणारा आहे असे म्हटले जाते आणि ते अगदी खरे आहे. पण चंद्र अणुऊर्जेसाठी मदत करील असे पूर्वी कधी वाटले नव्हते. परंतु लवकरच ते सत्य ठरणार आहे. मन, प्रेम, सागर, वनस्पती यांना ऊर्जा देणाऱया चंद्राच्या पोटात प्रचंड प्रमाणात आण्विक ऊर्जा सामावलेली आहे. ही ऊर्जा पृथ्वीवर आणण्यासाठी हिंदुस्थानी अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येत्या आक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू करणार आहे. विशेष म्हणजे चंद्रावरच्या अणुऊर्जेच्या शोधासाठी ही जगातील पहिलीच मोहीम असणार आहे. चंद्राच्या गर्भातील या ऊर्जेचे उत्खनन करून ती पृथ्वीवर आणणे शक्य झाल्यास पृथ्वीवासीयांची पुढील अडीचशे वर्षांची ऊर्जेची गरज भागेल असा दावा इस्रोच्या हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी केला आहे.
ही ऊर्जा चंद्राच्या दक्षिणेकडील भागात हिलीयम-3 या आयसोटोप स्वरूपामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हिची किंमत लाखो कोटी डॉलर्स एवढी आहे. तेथे पाणी असल्याचेही पूर्वी आढळले होते. विशेष म्हणजे या भागात अद्याप कोणत्याही देशाचे यान उतरलेले नाही की कोणी चांद्रवीर त्या भागात गेलेला नाही. तुम्ही विचाराल की, ‘हिलीयम-३ आयसोटोप पृथ्वीवर उपलब्ध नाही का? त्यासाठी चंद्रावर जाऊन आणण्याचा खटाटोप कशाला करायला हवा?’ होय. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. पृथ्वीवर हिलीयम-3 आयसोटोप उपल्ब्ध आहे, परंतु तो अगदी कमी प्रमाणात आहे. चंद्राच्या पोटात याचा विपुल साठा आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्राच्या दक्षिण भागात प्रदूषण विरहित, शुद्ध स्वरूपात तो उपलब्ध आहे.
हिलीयम–3
तुम्ही खग्रास सूर्यग्रहण पाहिले असेल. १६ फेब्रुवारी १९८०, २४ आक्टोबर १९९५, ११ आगस्ट १९९९, २२ जुलै २००९ या दिवशी हिंदुस्थानातून खग्रास सूर्यग्रहणे दिसली होती. मी ती पाहिली आहेत. तशी साधारणतः दरवर्षी खग्रास सूर्यग्रहणे पृथ्वीवरून कुठून ना कुठून तरी दिसत असतात. खग्रास सूर्यग्रहणात जेव्हा चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकते त्यावेळी खग्रास स्थितीमध्ये सूरबिंबाभोवती ‘प्रभाकिरीट’ म्हणजे ‘करोना’ दिसतो. या करोनाचे तापमान सुमारे दहा ते वीस लक्ष सेल्सिअस इतके असते. या करोनाचेच पुढे सौरवातात रूपांतर होते. या सौरवातात इतर द्रव्यांबरोबरच हिलीयम-३ याचे कणही असतात. पृथ्वीसभोवती असलेल्या वातावरणामुळे पृथ्वीवर सौरवाताचा विशेष परिणाम होत नाही. पण चंद्रावर सौरवात हिलीयम-३ द्रव्यासहित पोहोचतो. तसेच चंद्रावर होणाऱया अशनींच्या माऱयामुळे हिलीयम-३ मिश्रित माती पष्ठभागावर आणि पृष्ठभागाच्या खाली पसरलेली आहे. चंद्रावरील या हिलीयम-३ च्या साठय़ाकडे शास्त्रज्ञांचे लक्ष गेले.
न्यूक्लिअर फ्युजनमध्ये म्हणजेच अणुकेंद्र सम्मीलनाच्या प्रक्रियेत जर हिलीयम-३ चा उपयोग केला तर प्रचंड ऊर्जा प्राप्त होऊ शकेल असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांचे लक्ष चंद्राकडे गेले आहे. यासाठी एक सूत्र समजून घेणे जरूरीचे आहे. डय़ुटेरियम + हिलीयम=३ हिलीयम-४ + प्रोटॉन + १८.४ दशलक्ष इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा. डय़ुटेरिअम हा हायड्रोजनचाच एक प्रकार आहे. त्याला हेवी हायड्रोजन असेही म्हणतात. आपल्याला माहीत आहे की सामान्य हायड्रोजनच्या पेंद्रस्थानी एक प्रोटॉन असतो आणि त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन भ्रमण करीत असतो. सामान्य हिलीयमच्या केंद्रस्थानी दोन प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन कण असतात आणि त्यांच्याभोवती दोन इलेक्ट्रॉन भ्रमण करीत असतात. तर हिलीयम-३ च्या केंद्रस्थानी दोन प्रोटॉन व एक न्यूट्रॉन कण असतो. पण दोनच इलेक्ट्रॉन त्यांच्याभोवती भ्रमण करतात. डय़ुटेरिअम व हिलीयम-३ यांच्या सम्मीलनातून किती ऊर्जा निष्पन्न होते ही गोष्ट स्पष्ट होईल.
लुई अल्वारिझ आणि रॉबर्ट कोमाँग या दोन शास्त्रज्ञांनी १९३९ साली हिलीयम-३ चा शोध लावला. हिलीयम-३ पृथ्वीवर अतिशय दुर्मिळ आहे. अमेरिका आणि रशिया यांच्याकडेच हिलीयम-३ असण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानसारख्या विकसनशील देशाला म्हणूनच हिलीयम-३ साठी चंद्रावर स्वारी करावी लागत आहे आणि तेवढे सामर्थ्य हिंदुस्थानच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे आहे. हिलीयम-३ पृथ्वीवर यशस्वीरीत्या आणणारा देश हा संपूर्ण मोहिमेवर अधिकार गाजवेल. ही गोष्ट इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी स्पष्ट केली आहे.
चांद्रयान-२ मोहीम
सन २००८ साली हिंदुस्थानच्या इस्रोने चांद्रयान -१ हे यश्स्वीरीत्या चंद्राकडे पाठवले. सन २०१७ मध्ये एकाच रॉकेटद्वारे १०४ कत्रिम उपग्रह अंतराळात पाठवून इस्रोने विश्व विक्रम प्रस्थापित केला. आता लवकरच म्हणजे आक्टोबर २०१८ मध्ये चांद्रयान-२ हे यान चंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यामध्ये आरबिटर (१४०० किलोग्रॅम), लँडर (१२०० किलोग्रॅम) आणि आयतापृती रोव्हर (२०किलोग्रॅम) असेल. सहा चाकी असलेले हे वाहन (बग्गी) चंद्राच्या पृष्ठभागावर सौरऊर्जेवर चालणार आहे. रशियाने ही बग्गी वेळेत तयार करून देण्याची असमर्थता दर्शविल्याने हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांनी ती स्वतः तयार केली आहे. आरबिटर एक वर्षभर चंद्राभोवती फिरत राहील. रोव्हर वाहन १४ दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहिती गोळा करून लँडरकडे पाठवील आणि लँडर ती माहिती हिंदुस्थानातील इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे पाठवील. हिलीयम-३ पृथ्वीवर हिंदुस्थानात आणण्याबाबतची शक्यता त्याचवेळी कळून येईल. अर्थात हिलीयम-३ पृथ्वीवर हिंदुस्थानात आणणे हे वाटते तितके सोपे नाही. परंतु अंतराळ संशोधन क्षेत्रात हिंदुस्थानाने केलेली प्रगती पाहून हे काम आपले शास्त्रज्ञ नक्कीच यशस्वी करून दाखवतील यांत शंका नाही. विज्ञान क्षेत्रात ‘इंम्पॉसिबल’ असे काहीही नसते. इंम्पॉसिबल शब्दाचे स्पेलिंगसुद्धा ‘आय् एम् पॉसिबल’ असेच आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी अंतराळ क्षेत्रात कमविलेले हे यश कमी खर्चात मिळविले आहे. ज्या ब्रिटिश लोकांनी आपल्या हिंदुस्थानवर राज्य केले त्या ब्रिटिशांचे पृत्रिम उपग्रहही आपला देश कमी खर्चात अंतराळात पाठवतो. चंद्रावरून हिलीयम-३ पृथ्वीवर आणण्यात जर हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी जर यश मिळवले तर या जगातील ऊर्जा समस्या सोडविण्यास मोठा हातभार लागेल. म्हणून हिंदुस्थानच्या इस्रोच्या चांद्रयान-२ च्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला इस्रोच्या कार्याचा आणि आपल्या हिंदुस्थानी शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत आहे.






















































