
नमिता वारणकर ,[email protected]
आलेले नवे वर्ष अंतराळाच्या दृष्टीनेही घडामोडींचे ठरणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहण, इस्रोचे विविध उपक्रम याविषयी सांगताहेत खगोलतज्ञ अनिकेत सुळे..
अथांग अवकाशातील घटना… ग्रहविज्ञान…सूर्यग्रहण, चंद्रगहण… तसेच सभोवार पसरलेल्या आकाशातील ग्रह, ताऱयांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ‘खगोलशास्त्र’… दररोज रात्री आकाशात असंख्य तारका चमचमतात…आपल्या तेजाने सर्व दिशा उजळवून टाकणारा सूर्य आणि पृथ्वीच्या विशिष्ट स्थितीमुळे निर्माण होणारे ऋतू…यातील ठरावीक तारकासमूहात सूर्य किंवा चंद्र आला की, काय होते ? हे गूढ मानवी मनाला जाणून घ्यावेसे वाटतेच. यासाठी निरीक्षण आणि प्रयोगाच्या बळावर खगोलशास्त्रज्ञ आकाशातील घडामोडींचा अभ्यास करतात. यंदाचे नव वर्षही खगोल अभ्यासकांसाठी पर्वणीचे ठरणार आहे.
यावर्षी तीन सूर्यग्रहणे आणि 2 चंद्रगहणे असा एकूण पाच ग्रहणांचा योग जुळून आला आहे. विज्ञानाचाच एक भाग असलेल्या या शास्त्राबाबत खगोलतज्ञ अनिकेत सुळे सांगतात, हे वर्ष खंडग्रास सूर्यग्रहणाचं आहे. ते डिसेंबरमध्ये दिसणार आहे. याकरिता ते कुठे जाऊन बघता येईल, ग्रहण बघणे सोयीचे जावे याकरिता अजून काय करता येईल. याची तयारी यापूर्वीपासून खगोलशास्त्रज्ञ म्हणून आम्ही करायला सुरुवात केली आहे.
त्याचप्रमाणे येत्या वर्षभरात इस्त्रोकडून वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन कार्य होणार आहे. याअंतर्गत चांद्रयान 2 चं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदुस्थानतर्फे आपण टीएमटी, लायगो अशा महत्त्वाच्या नवीन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. लायगोसाठी महाराष्ट्रात हिंगोली जिह्यात जमीन घेतली आहे. तेथील प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल. टीएमटीवरही काम सुरू आहे, अशा महत्त्वपूर्ण घडामोडी 2019मध्ये होणार आहेत, अशी माहिती ते देतात.
संपूर्ण वर्षभरात किमान 4 तर कमाल 7 ग्रहणं होतात. यावर्षी 5 ग्रहणांचा योग आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, खंडग्रास सूर्यग्रहण अधूनमधून दिसतं, मात्र कंकणाकृती सूर्यग्रहण आता 10 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे. 16 जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे. दक्षिण हिंदुस्थानातील कोईम्बतूर, कन्नूर, मंगलोर, उटी या ठिकाणांहून सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्थितीचे दर्शन घडणार आहे. मुंबईमधून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. 21 जानेवारी 2019 आणि 19 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे.
नागरिकांना या वर्षातील खगोलशास्त्रीय घडामोडींचा कसा फायदा होईल, यावर खगोलतज्ञ अनिकेत सुळे सल्ला देतात की, खगोलशास्त्रच्या दृष्टीने जी आश्चर्यकारक घटना असते त्याकडे आम्ही एक पर्वणी म्हणून पाहतो. यानिमित्ताने आम्हाला लोकांना काहीतरी नवं सांगता येतं. त्यांचं प्रबोधन करता येतं. विज्ञानाचं महत्त्वही अशा वेळी लोकांच्या मनावर ठसतं. असे असले तरीही वर्षारंभ करताना ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घडामोडीबाबत अंधश्रद्धा बाळगू नका. खगोल आणि फलज्योतिष ही दोन्ही वेगवेगळी शास्त्र्ाs आहेत. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
इस्त्रोचे वर्षभरातील नवे प्रकल्प
अंतराळातील घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणींचा वापर करतात. जगभरात अनेक ठिकाणी अशा दुर्बिणी आहेत. तिचे नाव आहे टीएमटी म्हणजे थर्टी मीटर टेलिस्कोप. याचा अर्थ 30 मीटरची दुर्बीण. या सगळ्या 8 ते 10 मीटर व्यासाच्या आहेत, मात्र आता 30 मीटर व्यासाच्या दुर्बीण बांधण्याचे काम सुरू आहे. ही दुर्बीण आता 217 फुटांच्या घुमटात बसवण्यात येणार आहे. मोठय़ा दुर्बिणी ढगांहून उंच असणाऱया डोंगरांवर लावणे उत्तम मानले जाते. ही दुर्बीण इतर दुर्बिणीपेक्षा 30 टक्के अधिक शक्तिशाली असणार आहे. अमेरिका चीन, हिंदुस्थान, कॅनडा, जपान याची निर्मिती करत आहेत. यामध्ये हिंदुस्थानचे योगदान 10 टक्के आहे. काही वर्षांत टीएमटीला ऑनलाइन आणण्याचाही विचार सुरू आहे. यासाठी हिंदुस्थानला 300 खगोलशास्त्र्ाज्ञांची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये हिंदुस्थानची 10 टक्के भागीदारी असणार आहे. यासाठी दुर्बिणीचे काही यांत्रिक भाग हिंदुस्थानकडून पुरवले जाणार आहेत. त्यासाठी बंगळुरू आणि पुण्याच्या आयुका या संस्थाचा मुख्य सहभाग आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. 2024 पर्यंत ही दुर्बीण पूर्ण होईल.
विश्वातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण लहरींचा वेध लायगो प्रयोगशाळेत घेतला जातो. लायगो 1 आणि लायगो 2 अशा दोन प्रयोगशाळा अमेरिकेत आहेत. आता 3री वेधशाळा हिंदुस्थानात बांधण्याचा करार करण्यात आला आहे. यामुळे आपल्यालाही गुरुत्वीय लहरी नेमक्या कुठून आल्या, हे अचूक जाणून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. याकरिता लागणारी उपकरणं लायगो अमेरिकन ग्रुप पुरवणार आहे. त्यासाठी हिंगोली जिह्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
ग्रहणांचा योग उशिरा…
या वर्षानंतर कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण 2034 मध्ये दिसणार आहे. तेदेखील कश्मीरच्या काही भागात ऑगस्ट महिन्यात दिसणार आहे. स्वच्छ आकाशात हिंदुस्थानात ही दोन्ही ग्रहणे दिसण्याची शक्यता जवळजवळ 100 वर्षांनी येण्याची शक्यता आहे. कश्मीरमध्येही काही भागांतच ग्रहण दिसणार असून पावसाळ्याचे काही महिने सोडले तर निरभ्र आकाशातच हे ग्रहण दिसेल, असे अनिकेत सुळे यांचे म्हणणे आहे.
























































