Nisar Satellite Launch – इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने आपलं सर्वात महागडं निसार उपग्रह प्रक्षेपित केलं आहे. हा उपग्रह आज संध्याकाळी 5:40 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. हा एक उपग्रह इस्रो आणि नासा यांच्या सहकार्याने तयार केला आहे. तो सूर्याच्या समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवला जाईल. येथून तो संपूर्ण पृथ्वीवर लक्ष ठेवेल.

निसार हा इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. यामध्ये पहिल्यांदाच स्वीपएसएआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, 242 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यामध्ये उच्च रिझोल्यूशनसह पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे. या उपग्रहात नासाने प्रदान केलेले एल-बँड रडार आणि इस्रोने पुरवलेले एस-बँड रडार यांचा समावेश आहे.

हा उपग्रह दर 12 दिवसांनी पृथ्वीची संपूर्ण पृष्ठभाग स्कॅन करेल, ज्यामुळे भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, हिमनद्या आणि बर्फाच्या चादरींच्या हालचाली यांसारख्या नैसर्गिक प्रक्रियांचा अचूक अभ्यास करता येईल.