
युद्धखोर इस्रायलच्या साथीने इराणवर हल्ला करून जगाला संकटात ढकलणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकाकी पडले आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व फ्रान्ससारख्या अमेरिकेच्या भरवशाच्या मित्रांनी इराणविरुद्धच्या युद्धात ट्रम्प यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. त्यात आता इटली व स्पेनची भर पडली आहे. इटलीने अमेरिकेला सिसिली हवाई तळाचा वापर करू देण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर स्पेननेही अमेरिका-इस्रायलच्या विरोधात सूर लावला आहे.
अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने जगातील 20 टक्के तेलवाहतुकीचा मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे अवघे जग इंधन टंचाईच्या झळा सोसत आहे. ही सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेने ‘नाटो’सह अनेक देशांना वारंवार आवाहन केले, मात्र कोणत्याही देशाने अमेरिकेला प्रतिसाद दिलेला नाही. सर्वसाधारणपणे अमेरिकेने एखादे युद्ध सुरू केल्यास ब्रिटन, फ्रान्स हे देश तत्काळ अमेरिकेला मदत करतात, मात्र इराण युद्धापासून त्यांनी अंतर राखले आहे. हे आमचे युद्ध नाही असे प्रत्येक देशाचे म्हणणे आहे. उलट, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेवरच दबाव वाढवला आहे.
युद्ध संपवण्याचे ट्रम्प यांचे संकेत
ट्रम्प यांनी आज पुन्हा युद्ध थांबवण्याचे संकेत दिले. ‘होर्मुझ सुरू होवो किंवा न होवो, आम्ही त्यासाठी युद्ध करत बसणार नाही. आमचे लक्ष्य इराणची लष्करी आणि क्षेपणास्त्र क्षमता उद्ध्वस्त करणे हे आहे. आमचा भर त्यावरच राहील,’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘होर्मुझ खुले करण्याची जबाबदारी आता त्याचा वापर करणाऱयांची असेल. एकतर अमेरिकेकडून तेल खरेदी करा किंवा स्वतःच्या हिंमतीवर होर्मुझ खुले करा हे दोनच पर्याय आता आम्हाला साथ न देणाऱया देशांपुढे उरले आहेत,’ असे ट्रम्प म्हणाले.
आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील
इराणविरोधातील कारवायांसाठी इटलीने सिसिली हवाई तळ वापरण्याची परवानगी अमेरिकेला नाकारली. त्यासाठी इटलीने आंतरराष्ट्रीय नियमांचा हवाला दिला. आम्ही नियमांना बांधील आहोत, असे इटालीयन सरकारने स्पष्ट केले. अमेरिका सरकारशी आमचे संबंध उत्तम आहेत. त्यात कुठलाही तणाव नाही, असेही इटलीने नमूद केले.
अमेरिका हे विसरणार नाही – ट्रम्प
अमेरिकेला मदत न करणाऱया नाटो देशांवर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टीका केली. खासकरून त्यांनी फ्रान्सवर तोफ डागली. ‘फ्रान्सने आमच्याशी असहकार पुकारला आहे. अमेरिका हे विसरणार नाही,’ असे ट्रम्प म्हणाले.
जग कसे चालावे हे अमेरिका-इस्रायल ठरवू शकत नाही!
स्पेनच्या संरक्षणमंत्री मार्गारिटा रोब्लेस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘आंतरराष्ट्रीय नियमांना स्पेन बांधील आहे. दोन देशांनी युद्ध सुरू करायचे आणि इतरांनी मदत करण्याची अपेक्षा ठेवायची हे चुकीचे आहे. जग कसे चालावे हे एकटी अमेरिका किंवा इस्रायल ठरवू शकत नाही. आम्हाला कोणाच्या उपदेशांची गरज नाही,’ असे ते म्हणाले.
गुगलसह 18 आयटी कंपन्यांची कार्यालये उडवण्याची धमकी
अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेले हल्ले हा दहशतवाद आहे, असे सांगत या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून उद्यापासून गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, इंटेल आणि बोइंगसह अमेरिकेच्या 18 आयटी कंपन्यांवर हल्ले करण्याचा इशारा इराणने दिला आहे. या कंपन्या इराणमधील संहाराला मदत करत आहेत, असा आरोप इराणने केला आहे.



























































