चर्चांना पूर्णविराम; अखेर ‘अलिबाबा’चे जॅक मा दिसले, अडीच महिन्यांपासून होते गायब

जगातील धनाढ्यांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर असलेले, ‘अलिबाबा’ ग्रुपचे मालक जॅक मा हे अखेर समोर आले आहेत. जॅक मा हे गेल्या अडीच महिन्यांपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी सरकारचा हात असल्याच्या चर्चा जगभरात होत होत्या. मात्र अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून जॅक मा हे बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले.

चीनचे सर्वात श्रीमंत उद्योजक जॅक मा हे बुधवारी एका ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी शिक्षकांना संबोधित केले. ग्रामिण भागामध्ये शिक्षणाच्या संधींबाबत आयोजित केला जाणारा हा एक वार्षिक कार्यक्रम होता. जॅक मा हे या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती एका स्थानिक ब्लॉगमध्ये देण्यात आली होती, मात्र अडीच महिन्यांपासून ते गायब असल्याने यावर लोकांचा म्हणावा तसा विश्वास नव्हता. मात्र जेव्हा ते प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाले तेव्हा लोकांची खात्री पटली.

राष्ट्राध्यक्षांशी घेतला होता पंगा

चीनच्या नफेखोर आर्थिक संस्था व सरकारी बँकांवर तोफ डागून जॅक मा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतला होता. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा नव्हता. 10 ऑक्टोबरनंतर ते ट्विटरवरही सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कट-कारस्थान असल्याचा संशय बळावला होता.

व्यवसायातील मुस्कटदाबी रोखण्यासाठी यंत्रणा सुधारा, अशी मागणी जॅक मा यांनी केली होती. याचवेळी चीनच्या सरकारवर सडेतोड टीका करताना जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठांचा क्लब’ म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये शांघायच्या भाषणात केलेल्या या टीकेमुळे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी जॅक मा यांच्यावर चांगलीच भडकली होती. ते थेट राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या निशाण्यावर आले होते. तेव्हापासून ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांत दिसले नव्हते.

कंपन्यांवर कारवाई

जॅक मा यांनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर टीका केल्यानंतर सरकारने त्यांच्या कंपन्यांवर कारवाईचा धडाका लावला. चिनी अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये एंट ग्रुपच्या 37 अब्ज डॉलरचा आयपीओ निलंबित केला. तसेच अलिबाबा ग्रुपची चौकशी पूर्ण होईपर्यंत चीनमधून कुठेही बाहेर जायचे नाही, अशा सक्त सूचना दिल्या. याच महिन्यात ‘अफ्रिका के बिझनेस हिरोज’ या प्रसिद्ध शोच्या एपिसोडमधून जॅक यांचे नाव हटवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या