बरका फणस बनलाय जगातले सुपरफूड, परदेशात बनलाय मटणाला पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाने कोकणाला सौंदर्य दिले, तसेच आंबा फणसासारखी फळेही दिली. या फळांची झाडे कोकणाबाहेरही लावता येतील पण कोकणातल्या गोडवा त्यांच्यामध्ये कधीच आणता येणार नाही. कोकणचा हापूस जगामध्ये प्रसिद्ध आहे. आता कोकणपट्टीतील फणसही जगाचे सुपरफुड बनत आहे. कापा फणसापेक्षा मऊ बरक्या फणसाला जगात मागणी वाढली आहे आणि लॉकडाऊनमध्ये तर मांसाहाराला पर्याय म्हणून पण फणसावर उड्या पडत आहे. काटेरी हिरवा गोड वासाच्या बरच्या फणसाचे उत्पादन कोकणासह दक्षिण हिंदुस्थानातील किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये होते. पण आता फणस जगातील खवय्यांमध्ये प्रसिद्ध होऊ लागला आहे. कोकणपट्टीशिवाय दक्षिण आशियातील किनारपट्टीच्या प्रदेशामध्येही फणसाचे उत्पादन होते. तेथील नागरिकांच्या आहारामध्ये फणसाचा समावेश असतो. बांगलादेश आणि थायलंडमध्ये तर फणसाच्या उत्पादनाची स्पर्धा लागली आहे.

फणसापासून भाजी आणि विविध पदार्थ बनवले जातात. आजच्या आधुनिक जगातील स्वयंपाकी म्हणजेच शेफ हे बरक्या फणसापासून विविध पदार्थ बनवतात आणि त्यात पदार्थांसाठी बरक्या फणसाला दिल्लीपासून थेट इंग्लंड अमेरिकेपर्यंत मागणी वाढली आहे.केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात फणसाचे उत्पादन घेणारे वर्गीस थरक्कन यांना फणसासाठी परदेशातून फोन येतात.

रक्तदाब नियंत्रित ठेवतो फणस
फणसामध्ये औषधी गुणही आहेत. भात आणि चपात्या खाण्यापेक्षा फणस खाल्ला तर रक्तदाब नियंत्रित राहतो, असे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाच्या ग्लायसेमिट इंडेक्स रिसर्चने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे

लॉकडाऊनमध्ये फणसाने तारले
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील लोकांनी मांसाहार खाणे बहुतांशी बंदच केले. सर्वजण शाकाहाराला प्राधान्य देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत परदेशांमध्ये फणसाला मागणी वाढली आहे. सोयाबीनपासून बनवण्यात आलेले टोफू, टेम्पे यांचा वापर तिथे मटणाला पर्याय म्हणून वाढला आहे. आता त्यात फणसही आला आहे. फणसापासूनही मटणासारखी लज्जतदार डिश बनवली जाऊ शकते. त्या डिशला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. देशातही लोकांच्या लॉकडाऊनच्या काळात अनेक भागांमध्ये भाजी मिळणेही कठीण झाले आहे. आणि मिळाली तरी बाहेरून आणलेली भाजी घेण्यास लोकांना भीती वाटत आहे. केरळमध्ये झाडावरचा फणस काढून त्याची भाजी बनवली जात आहे.

मायक्रोसॉफ्टचे संचालक नोकरी चोरून फणसाच्या उद्योगात
पाशिमात्यांमध्ये फणसाला मागणी वाढू लागल्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक संचालक असलेले जेम्स जोसेफ यांनी आपली नोकरी सोडून फणसाच्या उद्योगाकडे वळवण्याचे ठरवले आहे. पाश्चिमात्य देशात मटणाला पर्याय म्हणून फणस वापरला जातो. पिझ्जावरील टॉपिंग साठीही फणसाचे गरे वापरले जाता, आणि लोकांना ते खूप आवडते. फणसाच्या ‘जॅकफ्रूट कटलेट’ वर तर खवय्ये तुटून पडतात असे त्यांनी सांगितले.