
सामना प्रतिनिधी ।मालवण
मालवणात ‘जेलभरो’ आंदोलना साठी हजारो मराठा बांधव व भगिनी गुरुवारी रस्त्यावर उतरले. क्रांती दिनाचे औचित्य साधून छेडण्यात आलेल्या या आंदोलना दरम्यान आरक्षणासह विविध मागण्यांच्या घोषणांनी मराठा बांधवांनी मालवण नगरी दणाणून सोडली.
मराठा बांधवांचे नेते अशोक सावंत व युवकांचे नेते बाबा परब यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मालवण भरड येथे एकत्र आले. यावेळी स्वराज्य महिला ढोल-ताशा पथकाने आसमंत दणाणून सोडला. त्यानंतर बाजरपेठ मार्गे मराठा बांधव पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. या रॅलीत मोटरसायकल स्वार व कारचालकही सहभागी होते. मसुरा विभागातून सर्वाधिक मराठा बांधव या जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, कोणतीही पूर्वकल्पना न देता एसटी बस सेवा बंद ठेवल्याने विद्यार्थी व प्रवासी वर्गाचे मात्र हाल झाले. तर आडारी पुलावर अज्ञातांनी टायर जाळल्याची घटनेचा अपवाद वगळता तालुक्यात सर्वत्र शांततेत आंदोलन पार पडले.
summary…jailbharo protest in malvan































































