इन्स्टावर रिल्स बनवायची, 40 हजार फॉलोअर्स अन् अफेअर; 5 मुलांची आई प्रियकरासोबत फरार

राजस्थानमधील जैसलमेर येथे एक हैराण करून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भागात असणाऱ्या एका गावातील 32 वर्षीय महिलेला इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याचे वेड होते. हळूहळू तिच्या फॉलोअर्सची संख्या हजारांमध्ये पोहोचली. इन्स्टाग्रामवरच एका तरुणीने महिलेशी मैत्री केली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे ही महिला पाच मुलांची आई असून पती व मुलांना सोडून आता ती प्रियकरासोबत फरार झाली असून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेर जिल्ह्यातील किता गावात राहणाऱ्या नेमी देवी हिचे 15 वर्षांपूर्वी झिनझिनियाली पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या गजे सिंहजवळील ढाणी येथे राहणाऱ्या नारणा राम भील यांच्यासोबत झाले होते. नेमी देवी 32 वर्षीय असून ती कधी शाळेतही गेलेली नाही. लग्नानंतर या जोडप्याला पाच मुलं झाली. विरंगुळा म्हणून नेमी देवी हिने इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करत होती. इन्स्टाग्रामवर तिचे 40 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर रिल्स टाकताना तिची ओळख लोकगीत गाणाऱ्या भिमाराय याच्याशी झाली. दोघे एकमेकांशी बोलू लागले आणि नंतर प्रेमात पडले. जवळपास दीड ते दोन वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू झाले होते. यानंतर दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. नेमी देवीने सासरहून पळ काढला. पतीला याची काहीही कल्पना नसल्याने त्याने जैसलमेरच्या सदर पोलीस स्थानकात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी नेमी देवीचा शोध सुरू केला. सोमवारी बाडमेर जिल्हा मुख्यालयात ही महिला प्रियकरासोब हजर झाली. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. चौकशीदरम्यान नेमी देवीने आपल्याला पाच मुलं असल्याचे सांगितले. तसेच पती आपल्याला मारहाण करतो आणि नेहमी संशय घेतो. याला कंटाळून इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या लोकगीतकार भीमाराय याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेण्याचे नेमी देवी हिने सांगितले.

इन्स्टाग्रामवरूनच दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. प्रेमात पडलेले हे जोडपे गुजरातच्या पालनपूरमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागले. दोघांच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आता ते स्वत: हजर झाल्याचे यामागील कारण स्पष्ट झाले आहे. आता ते दोघेही लग्न करणार असून जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका केली.