
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास कश्मीरीने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल केली आहे. मसूद अझहरच दिल्ली आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची कबुली कश्मीरीने दिली. एका कार्यक्रमात मसूद अझहरनेच संसद हल्ला आणि 26/11 चा दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचं इलियास कश्मीरीने म्हटलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे पाकिस्तान नाकारत असते. मात्र कश्मीरीच्या कबुलीमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. बालाकोट आणि बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदची दहशतवादी तळं असल्याचेही इलियास कश्मीरीने सांगितले. तसेच अझहर बालाकोटमधील तळावर लपला होता, जेथे 2019 मध्ये हिंदुस्थानने हल्ला केला होता. मौलाना मसूद अझहर दिल्लीतील तिहार तुरुंगातून पाकिस्तानात आला होता, असेही कश्मीरी व्हिडिओत म्हणाला.
इलियास कश्मीरी पुढे म्हणाला की, 7 मे रोजी हिंदुस्थानी हवाई दलाने जैशच्या बहावलपूर येथील मुख्यालय जामिया मस्जिद सुभान अल्लाहवर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला. बहावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या जैश दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, असा खुलासाही कश्मीरीने केला. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यावेळी हिंदुस्थानने दहशतवाद्यांना राज्य सन्मान दिल्याबद्दल पाकिस्तानला फटकारले होते.