काबूलमध्ये हिंदुस्थान सुरू करणार दूतावास

हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आलेले अफगाणीस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात आज द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी काबूलमध्ये पुन्हा हिंदुस्थानी दूतावास सुरू करण्याची घोषणा जयशंकर यांनी केली आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोचे सैन्य परत बोलवल्यानंतर ऑगस्ट 2021 पासून अफगाणीस्तानमध्ये तालिबनचे सरकार आहे. तालिबान सरकारचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. अमीर खान मुत्ताकी या दौऱ्यात सहारनपूरमधील दारूल उलूम देवबंद मदरसा आणि ताजमहललाही भेट देणार आहेत. आज हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि अमीर खान मुत्ताकी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी 2021 पासून काबूलमध्ये बंद असलेले हिंदुस्थानचे दूतावास पुन्हा सुरू करण्यात येईल अशी घोषणा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली. दूतावास बंद असले तरी हिंदुस्थानने व्यापार, मेडिकल सपोर्ट, मानवतावादी मदत सुरू ठेवण्यासाठी मिशन उघडले होते. मात्र, आता लवकरच दूतावास सुरू होईल, अशी माहिती जयशंकर यांनी दिली. हिंदुस्थान हा अफगाणिस्तानचा जवळचा मित्र आहे, असे मुत्ताकी यांनी सांगितले.