
जालन्यातील चंदनझिरा भागात लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. यानंतर एका सोळा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन राहुल साळवे (16)असे मयत मुलाचे नाव आहे. ही घटना जालना शहरातील चंदनझिरा येथे शुक्रवार 18 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास चंदनझिरा भागात एका लग्नाची वरात निघाली आणि वरातीमध्ये मित्रामित्रांची भांडणे झाली. यामध्ये रोहन साळवे होता. त्याच्या वडिलांनी त्याला घरी नेले. त्या पाठोपाठच रोहनचे मित्र देखील हातात काही शस्त्र घेऊन रोहनच्या घरासमोर आले. दरम्यान, घरासमोर त्यांच्यातील भांडणे मिटविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा रोहन साळवे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री दीड वाजता रोहन साळवे याला त्याच्या घरच्यांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शवविच्छेदनानंतर शनिवारी रोहनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.