
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून पाच वर्षानंतर पहिल्यांदा हे धरण पूर्ण भरले आहे. धरण पूर्ण भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. बदनापूर तालुक्यात यंदा निसर्गाची चांगलीच कृपा आहे. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पात 13 फूट पाणी आले असून मागील पाच वर्षानंतर या धरणात एवढा जलसाठा जमा झाला आहे. बदनापूरच्या तहसीलदार छाया पवार व संतोष वरकड यांनी या धरणातील पाणीसाठा आणि सांडवा वाहत असलेल्या ठिकाणी पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
सोमठाणा येथे अप्पर दुधना प्रकल्प 1965 मध्ये 81 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. धरणाचे पाणलोट क्षेत्र 248 चौरस कि.मी. आहे. 1962 मध्ये धरणाच्या बांधकामास सुरवात होऊन काम तीन वर्षात काम पूर्ण झाले होते. धरणाची उंची 17.68 फूट आहे तर एकूण पाणीसाठा 15.39 द.ल.घनमीटर आहे तर पाणलोट क्षेत्र 248 चौरस किलो मीटर आहे. या धरणाखाली समादेश क्षेत्र 5 हजार 708 हेक्टर तर लागवडी 5 हजार 283 हेक्टर असून सिंचन योग्य क्षेत्र 3 हजार 401 हेक्टर आहे. सोमठाणा धरणातील पाणीसाठ्याचा फायदा शेतकऱ्यांना यंदा होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. यंदा रब्बीच्या पिकांना कालव्याद्वारे पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे कोरडवाहू शेतकरीही सुखावला आहे. पाच वर्षानंतर धरणात मोठ्या प्रमाणात उपयुक्त जलसाठा झाला आहे. पाच वर्षानंतर पहिल्यांदा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.




























































