संततधार पावसामुळे जळकोट तालुक्यातील मौजे मरसांगवी येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कब्रस्तानाकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने नाईलाज म्हणून नागरिकांना जीव धोक्यात घालून भर पाण्यातून कब्रस्तान गाठावे लागत आहे.
मरसांगवी-अतनूर रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अतनूर-रावणकोळा-बार्हाळी-उदगीर या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. मरसांगवी येथील ग्रामस्थांनी या पुलाची उंची वाढावी, अशी अनेकवेळा मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मरसांगवी येथील मुस्लिम समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. अतनूर रोडवर असलेल्या कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी पूल ओलांडून जाणे आवश्यक होते. पुलावरून कमरेएवढे पाणी वाहत असल्याने दफनविधी थांबवून ठेवावा लागला. परंतु, पाऊस थांबत नसल्याने शेवटी भर पाण्यातून ट्रॅक्टर कब्रस्तानकडे घेऊन जाण्यात आले. दफनविधी होऊन येईपर्यंत पुलावरील पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना तेथेच पाणी कमी होण्याची वाट बघत बसावे लागले