
जालना शहरासह परिसरात आज दुपारनंतर अवघ्या अध्यर्ध्या तासात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी ओसंडून वाहू लागले. नाल्या तुडुंब भरल्या. शहरातील झोपडपट्टी भागांत पाणी घरात शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठा, मुख्य रस्ते, काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. विजेच्या कडकडाटासह पावसामुळे अनेक झाडांची फांद्या तुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नाल्यांची सफाई न झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रस्त्यांवर पाणी साचले, वाहतुकीला अडथळा शहरात शनिवारी दुपारनंतर अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. काही भागांमध्ये तर नाले तुडुंब भरून वाहू लागले. परिणामी अनेक वाहनचालकांना रस्त्यांवरच गाड्या उभ्या कराव्या लागल्या. विशेषतः शनिमंदिर, कचेरी रोड, टाऊन हॉल, गांधीचमन, नूतन वसाहत, स्टेशन रोड, बसस्थानक परिसर व अन्य काही भागात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. काही दुचाकीस्वार व रिक्षाचालकांना पाण्यात अडकल्यामुळे वाहन थांबवावे लागले. काही वाहनांचे इंजिनदेखील बंद पडल्याचे पाहायला मिळाले.
नाले सफाईचा अभाव आणि अकार्यक्षम ड्रेनेज व्यवस्था यामुळेच दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती निर्माण होते, असा नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, पावसामुळे शहरात काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसाने शहराची गती काही काळ विस्कळीत झाली.