जालना शहरातून बेपत्ता झालेले एपीआय 13 दिवसांनंतर सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातून बेपत्ता झालेले जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे गेल्या 13 दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते. ते सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील महामार्गावरील जुना टोलनाका या परिसरात आढळून आले आहेत. त्यांना एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

संग्राम ताटे हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील महामार्गावरील जुना टोलनाका येथे दोन दिवसांपासून एकाच ठिकाणी राहून कसेबसे जेवण करून राहत होते. याबाबत काही जणांनी खंडाळा पोलिसांना माहिती दिली. यावेळी खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या सुचनेनुसार पीएसआय पांगारे, पोलीस पिसाळ यांनी अधिक तपास करता हे बेपत्ता असलेले ताटे असल्याचे निष्पन्न झाले.

खूप दिवस जेवणाची हडबड पाहता, त्यांना खूपच अशक्तपणा जाणवत असल्याने, त्यांना शिरवळ येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान जालना येथून तपास अधिकारी पोलीस महेश टाक यांना याबाबत सर्व माहिती देऊन बोलविण्यात आले असल्याचे खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले.