झोपेतच गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून, जालना जिल्ह्यातील घटनेने खळबळ

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील समर्थ बेकरीत काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचा झोपेतच गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना 22 फ्रेब्रुवारी रोजी सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. ज्ञानेश्वर बंडू शेडगे (वय -24, रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तीर्थपुरी येथे शहागड रोडवर रामहरी तुळशीराम सुरोसे (रा. कृष्णनगर, साडेगाव ता.अंबड) व संतोष बापूसिंग परदेशी (रा. कडाआष्टी ता. जि. बीड) या दोघांच्या मालकीची समर्थ बेकरी आहे. दुकानावर मयत ज्ञानेश्वर शेडगे तीन वर्षांपासून कामाला होता. बेकरीत ज्ञानेश्वरसह बेकरी मालक संतोष परदेशी यांचा मेव्हणा दिगंबर जमादारसिंग परिहार (रा. घुंगर्डे हादगाव ता. अंबड), सचिन पांडुसिंग परदेशी (रा. सोनई ता. नेवासे जी. नगर) हे झोपत असे.

घटना घडल्याच्या दिवशी दिगंबर परिहार हा काही कारणाने गावाकडे गेला असल्याने बेकरीवर मयत ज्ञानेश्वर शेडगे व सचिन परदेशी हे दोघेच होते. सचिन परदेशी याने दिलेल्या माहितीनुसार, लघुशंकेला बाहेर गेलो असता पाठीमागील दरवाजा जवळून दोघेजण पळून जाताना दिसले. परत आत आल्यावर ज्ञानेश्वर हा बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला.

सचिनने याची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, सहाय्यक फौजदार श्रीधर खडेकर, पो.कॉ. भगवान शिंदे, योगेश दाभाडे, माळी यांनी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह तीर्थपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला.

दरम्यान, जोपर्यंत संशयित आरोपी व बेकरी मालकाला ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन होऊ देणार नाही असे म्हणत मयताच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनाला विरोध केला. अखेर पोलिसांनी संशयित सचिन पांडुसिंग परदेशी याला ताब्यात घेतल्यानंतर 15 तासानंतर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी मयताचे वडील बंडू शेडगे यांच्या फिर्यादीवरून भादंवी कलम 302 नुसार गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या