
जालन्यात भोकरदन परिसरात रात्री 11 च्या दरम्यान भर रस्त्यात तलवारीने वार करत एकाची हत्या केल्याची घटना घडली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन एकावर तलवारीने वार केले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. उमेश समाधान ईंचे याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र राम सखाराम निकाळजे हा गंभीर जाखमी झाला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. रुपेश शेळके आणि पवन जाधव हे संशयित आरोपी आहेत. दरम्यान सदर बाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
तीन चार हल्लेखोर धारधार शस्त्रांनी वार करत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, डिबी प्रमुख शैलैश म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे, अमंलदार रामप्रसाद रंगे, भरत ढाकणे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन उमेश समाधान ईंचे यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या हल्ल्यामागील कारण अजूनही अस्पष्ट असून कौटुंबिक कारणावरून हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत व्यक्ती उमेश समाधान ईंचे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संतोष भिसे, पवन जाधव, आर्यन उद्धार आणि रुपेश शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सदर बाजार पोलीस पुढील तपास करत आहेत.
 
             
		





































 
     
    






















