जालना – जिल्हा मध्यवर्ती बँक फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या, साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील वाटूर फाटा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 दिवसांत छडा लावला आहे. तिजोरी मधील चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी 4 लाख 54 हजार 800 रुपये नगदीसह साहित्य व वाहने असा एकूण 14 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील वाटूर फाटा येथील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वाटूर फाटा येथे 22 ऑक्टोंबर दरोडा टाकण्यात आला होता. बँकेच्या मागच्या बाजुस असलेली खिडकी व भिंत फोडून आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रोकडसह तिजोरी व इतर साहित्य चोरुन नेले होते. त्यावरुन परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांनी भेट दिली होती.

पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर यांनी गुन्ह्याची पद्धत लक्षात घेऊन वेगवेगळे पथके तयार केली होती. दरम्यान, 24 ऑक्टोंबर रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत जालना शहरातील रेकॉर्डवरील आरोपी सागर उर्फ पिराजी डिंगाबर डुकरे (रा. शनिमंदिर, आनंदीस्वामी गल्ली, जालना) व त्याच्या साथीदारांनी वाटूर फाटा येथील बँक फोडल्याची माहिती मिळाली.

त्यावरुन पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सागर उर्फ पिराजी डिंगाबर डुकरे यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कृष्णा भगवान गजमल (रा. डासाळा ता. सेलु, जि. परभणी), सुनिल शालिक झिने (रा. इंदीरानगर, हनुमानमंदिर, जालना), विनोद उर्फ लाल्या गजानन तांबेकर (रा. मंमादेवीनगर राममंदिर, जुना जालना), अभिषेक अनंतराव कुलकर्णी (रा. आनंदीस्वामी गल्ली जालना), आनंद हरिभाऊ वानखेडे (रा. इंदीरानगर, जालना) यांच्यासह हा गुन्हा केल्याचे सांगितले.

सदर पाचही आरोपीना वेगवेगळ्या ठिकाणावरुन तात्काळ अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील 3 लाख 71 हजार 800 व चोरलेल्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तु, नवीन मोबाईल व कॅमेरा, बँकेतून चोरीस गेलेली गोदरेज तिजोरी, इन्व्हर्टर, बॅटऱ्या, प्रिन्टर, फॅन असा 54 हजार 250 रुपयांचा ऐवज तसेच गुन्हा करतांना वापरलेली स्विफ्ट कार, टाटा सुमो जिप, दोन मोटार सायकल, तिजोरी फोडण्यासाठी वापरलेले कट्टर मशीन, लोखंडी पास, गुन्ह्यात वापरलेली मोबाईल एकूण 9 लाख ४३ हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या