जालन्यात लॉकडाऊन शहर झाले चिडीचुप, रस्ते शुकशुकाट

404

जालना जिल्ह्यात कोरोना बाधित व कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढतच आहे. त्यात जालना शहरात कोरोनाने प्रचंड विळखा घातला असल्याने सर्वांधिक रुग्ण हे जालना शहरातीलच आहेत. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जालना शहरात जास्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी रविवारी रात्री 12 वाजेपासून पुढील दहा दिवस शहरात लाकडाऊन केले आहे.

आज सकाळपासूनच शहरातील नागरिक घराबाहेर पडलेच नाही. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. चौकाचौकात बॅरेकेटींग लावण्यात आले असून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे विशेष लक्ष ठेवून आहे.

संभाजीनगर पाठोपाठ जालना जिल्ह्यात कोरोना विषाणुचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे आतापर्यंत 26 जणांचे बळी गेले आहेत. यात सर्वांधिक रुग्ण व मृत्यूची संख्या शहरातीलच आहे. शहरात दाटीवाटीच्या वस्त्या व बाजारपेठ, रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांचा वावर जास्त वाढला होता. याचा परिणाम कोरोना वाढीस झाला असल्याने जिल्हा प्रशासनाने 5 ते 15 जुलैदरम्यान संपुर्ण शहर लॉकडाऊन करुन संचारबंदी लावली आहे.

शहरातील गजबजलेले रस्ते आज सकाळपासून ओस पडली होती. मुख्य मार्केट, बाजारपेठेतही सन्नाटा दिसून आला. पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळीच सायरन वाजत वाहने फिरवून नागरिकांना सावध करीत कोणीही घराबाहेर पडू नये, अशा सुचना करीत होते.

आपली प्रतिक्रिया द्या