Jalna News – ढिगारा काढताना विहीर खचली, तोल जाऊन पडल्याने लोखंडी गज डोक्यात घुसली, मालकाचा मृत्यू

विहिरीतील ढिगारा काढताना विहिर खचली अन् अंगावर पडली. यामुळे तोल जाऊन पडल्याने लोखंडी गज डोक्यात घुसून मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जिन्नसराव शेषराव बनकर (50) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

देळेगव्हाण येथील जिन्नसराव बनकर यांचे गावाला लागूनच शेत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू आहे. विहिरीचे बांधकाम प्रगतीपथावर असताना आज सकाळच्या सुमारास बनकर हे बांधकामात अडथळा ठरत असलेला विहिरीतील ढिगारा काढण्यासाठी विहिरीत उतरले होते.

यावेळी अचानक विहिरीची वरची बाजू खचली आणि बनकर यांच्या अंगावर माती आली. या दरम्यान त्यांचा तोल जाऊन विहिरीच्या बांधकामावरील लोखंडी गज त्यांच्या डोक्यात शिरल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध झाले. यानंतर त्यांचा मुलगा कृष्णा याने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ बाहेर काढत जालना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले.

बनकर यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बनकर यांच्या पश्चात आई, पत्नी, चार बहिणी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.