जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप शिवारातील सोमनाथ सहाने यांच्या शेतातील विहिरीत पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकर्याला आज 10 ऑक्टोंबर रोजी सांयकाळच्या सुमारास एक मृतदेह तरंगताना आढळून आला. हा मृतदेह 35 ते 40 वर्षीय महिलेचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. संबंधित शेतकर्याने तातडीने गावातील पोलीस पाटील आणि पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी विहिरीजवळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तो मृतदेह विहिरीतुन चारपायी बाजेच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. मृतदेह स्त्रीचे कपडे परिधान केलेले असल्यामुळे महिलेचा असल्याचा अंदाज होता, मात्र, यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात सदर व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे निदर्शनास आले आहे. या मृतदेहाचा गळा कापण्यात आलेला असून, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना अंदाजे दोन-तीन दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, सदर तृतीयपंथी व्यक्तीचा गळा चिरून खून करून मृतदेह विहिरीत टाकला असण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे हे करीत असून, या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन किरण बिडवे यांनी केले आहे.