
शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई शिवारात ही घटना घडली. गणेश प्रकाश जाधव (35) आणि सचिन विलास बावस्कर (28) अशी मृतांची तर प्रशांत रमेश सोनवणे असे जखमीचे नाव आहे. जखमी प्रशांतला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
कोठाकोळी येथील हे तिघेही तरुण सकाळी कामानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे आले होते. दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी गणेश जाधव आणि सचिन बावस्कर यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत सोनुने हा गंभीर जखमी झाला.
दोघांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी पिंपळगाव रेणुकाई येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले. गणेश हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर सचिन बावस्कर हा तरुण अविवाहित होता.