
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही संभाजीनगर हद्दीतून कुणालाही येऊ देऊ नये असे आदेश दिले होते. असं असतानाही काही जण जुन्या रस्त्याचा व समृद्धी महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश करत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते. यामुळे बदनापूर पोलिसांनी मंगळवारी या चोर रस्त्यावर थेट जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदले. आणखी काही चोर रस्ते आढळल्यास ते देखील अशाच पद्धतीने बंद करण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले आहे.
जालना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी वरुडी येथे चेक पोस्ट असून तेथे कसून तपासणी करूनच वाहने सोडण्यात येत आहेत. त्यामुळे काही जण चोर रस्त्याचा वापर करतात. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पीएसओ शेळके व शिवाजी भगत यांनी चोर रस्त्यांचा शोध घेतला. शेकटाकडून जुना ढवळापुरी रस्ता, त्याच प्रमाणे जुने गेवराई रेल्वे स्टेशन रस्ता, समृद्धी महामार्ग या रस्त्यावरुन ही अवैध वाहतुक होत असल्याचे त्यांना कळाले होते. यामुळे जेसीबी आणून या रस्त्यावर आडवे चर खोदून मोठं मोठे खड्डे करण्यात आले आहेत ज्यामुळे या रस्त्यावरून वाहने जाणार नाही.




























































