
इंग्लंडचा मध्यमगती गोलंदाज जेम्स ऑण्डरसन याने मंगळवारी साऊथम्पटन कसोटीच्या अखेरच्या दिवशी अझर अलीला स्लीपमध्ये उभ्या जो रूटकरवी झेलबाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींना गवसणी घातली. जगातील कानाकोपर्यामधून जेम्स ऑण्डरसनवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पाकिस्तानविरुद्धची अखेरची कसोटी ड्रॉ झाल्यानंतरही कसोटी मालिका खिशात घालणार्या इंग्लंड ऑण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडूनही (ईसीबी) जेम्स ऑण्डरसनचे कौतुक करण्यात आले, पण कौतुक करताना त्यांच्याकडून चूक घडली. सोशल साईटवर टाकलेल्या फोटोमध्ये त्यांनी जेम्स ऑण्डरसनच्या पायाखाली इतर राष्ट्रांचे ध्वज दाखवले आहेत. त्यामुळे प्रत्येक देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच यामुळे नवा वादही निर्माण झाला आहे.
त्या फोटोमध्ये काय आहे?
जेम्स ऑण्डरसनने 600 बळी घेतल्यानंतर ईसीबीकडून एक फोटो सोशल साईटवर प्रसिद्ध करण्यात आला. या फोटोमध्ये जेम्स ऑण्डरसनच्या नऊ इमेज दाखवण्यात आल्या आहेत. त्याच्या पायाखाली प्रत्येक देशाचे ध्वजही दाखवण्यात आले आहेत. त्या देशाविरुद्ध जेम्स ऑण्डरसनने घेतलेल्या बळींची संख्या त्या इमेजच्या बाजूला अधोरेखित करण्यात आलेली आहे.























































